प्रतिनिधी /पणजी :
अटलसेतू पुलाच्या फोंडय़ाच्या बाजूने जाणाऱया रस्त्याच्या खचलेल्या जागी काँक्रिटीकरणाचे काम गुरुवारी पूर्ण झाले आहे. पुढील 15 दिवसात या बाजूने वाहतूक पूर्ववत सुरू केली जाणार आहे.
गोवा पायाभूत सुविधा महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लार्सन ऍण्ड टुब्रो या कंपनीतर्फे हे काम चालू आहे. कंपनीने मांडवी नदीवरील या अटलसेतूचे बांधकाम पूर्ण केले आहे. पुढील 5 वर्षात जी काही छोटी मोठी दुरूस्ती असेल ते काम सदर कंपनी स्वखर्चाने करत राहणार आहे. पूल सुरू झाल्यानंतर अलिकडेच मे मध्ये फेंडा बाजूच्या पुलाचा रस्ता व पूल जिथे एकत्र मिळतात त्या ठिकाणी रस्ता थोडा खचला होता. परिणामी पुलावर जाताना गाडीला मोठे हादरे बसू लागले. यामुळे हा भाग तोडून काढून नव्याने त्या ठिकाणी काँक्रिट स्लॅब टाकण्यात आला आहे. हे काम गेले दोन महिने चालू आहे. गुरुवारी महत्वाच्या भागात पूल व रस्ता जोडला जातो त्या ठिकाणी स्लॅब घालण्याचे काम सुरू करण्यात येऊन ते पूर्णही झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील दिवसांमध्ये या पुलावरून पुन्हा वाहतूक सुरू होईल. त्यामुळे फोंडामार्गे येणाऱया गाडय़ांना पणजीत बस स्थानकापर्यंत येऊन पुढे जाण्याची गरज पडणार नाही. थेट अटलसेतूवरून पर्वरीत जाणे सोयीस्कर होईल.