ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशातील मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेल्या ‘अटल टनल रोहतांग’ या बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.
‘अटल टनल रोहतांग’ हा बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवर (10,040 फूट) बनवण्यात आला आहे. त्याची लांबी 9.03 किमी आहे. पीरपंजाल डोंगररांगांना भेदून हा बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यासाठी 3300 कोटी खर्च करण्यात आले आहेत. भारताच्या युद्धनीती विषयक धोरणांसाठी हा बोगदा महत्वाचा भाग ठरणार आहे. या बोगद्यामुळे भारतीय सैन्याला चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर सहज पोहचता येणार आहे.
हिमाचल प्रदेशात हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. त्यामुळे तेथील मोठ्या प्रदेशांचा संपर्क तुटतो. मात्र, या बोगद्यामुळे हा प्रदेश 12 महिने संपर्कात राहणार आहे. या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर 46 किमीने कमी होणार आहे. त्यामुळे केवळ दीड तासात मनाली ते केलांगपर्यंत पोहोचता येणार आहे.
बोगद्याच्या उद्घाटनाला सिडीएस जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख मनोज नरवणे आणि सरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.