वार्ताहर/ कोरेगाव
भारत सरकारने देशातील असंघटीत क्षेत्रातील नागरिकांसाठी सुरु पेलेल्या अटल पेन्शन योजनेच्या तळागाळापर्यंत प्रचार प्रसारात सातारा जिह्यातील सर्वच बॅंकांनी देशात सर्वात्कृष्ठ कामगिरी केली आहे. या मोहिमेसाठी अग्रणी महाबॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर यांना याबद्दल सिटीजन चॉईस ऍवार्डने नवी दिल्ली येथे सन्मानित केले.
शासकीय नोकरदारांना वृध्दापकाळाची सोय म्हणून पेन्शन सुविधा आहे. मात्र असंघटीत क्षेत्रातील कामगार, व्यावसायिक अशा सोयीपासून दुर होते. दोन वर्षापुर्वी भारत सरकारने 2015 साली देशातील गरीब व मध्यमवर्गीय असंघटीत वर्गाला वृध्दापकाळात आर्थिक मदतीसाठी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल पेन्शन योजना सुरु केली. सरकारच्या महत्वकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी पेन्शन निधी नियामक प्राधिकरणाकडे सोपवली गेली. सातारा जिह्यात या योजनेच्या प्रचार व प्रसाराची भूमिका अग्रणी बॅंकेच्या नात्याने महाराष्ट्र बॅकेकडे होती. अग्रणी महाबॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर यांनी जिह्यातील महाराष्ट्र बॅंकेच्या सर्व शाखासह इतर 38 राष्ट्रीयकृत बॅंकेच्या 575 शाखामधून अटल पेन्शन योजनेच्या प्रचार व प्रसाराची धूरा यशस्वीपणे सांभाळली आहे. यामुळे सातारा जिह्याने संपूर्ण देशात सर्वोत्कृष्ठ कामगिरीची नोंद केली. याबद्दल महादेव शिरोळकर यांना निधी प्राधिकरणाच्यावतीने सिटीजन चॉईस ऍवार्ड देऊन गौरवण्यात आले. नवी दिल्ली येथे विशेष कार्यक्रमात पेन्शन निधी प्राधिकरणाचे मुख्य प्रबंधक आशिष कुमार, स्टेट बॅंकचे कार्यकारी संचालक पी.के.गुप्ता, पेन्शन विभागाचे सचिव सुप्रतिम बंडोपाध्याय व इतर मान्यवरांच्या हस्ते महादेव शिरोळकरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, नुतन जिल्हाधिकारी शेखर सिंग, बॅक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय प्रबंधक वसंत गागरे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे हरिष पाटणे व सर्व बॅंकाचे प्रबंधक यांनी अभिनंदन केले.