लवकरच मार्ग बंद करण्याचा : जीएसआयडीसीचा निर्णय
प्रतिनिधी /पणजी
अटल सेतू पुलाच्या मेरशी बाजूने असलेला खांब चिखलमय जमिनीत खाली सरकू लागल्याने पूल आणि रस्ता या दरम्यानच्या जोडमध्ये दरी वाढत गेल्याने अखेर हा पूल वाहतुकीस बंद करून नव्याने तातडीची दुरुस्ती करण्याचा निर्णय गोवा पायाभूत विकास महामंडळाने घेतला आहे.
या संदर्भात दै. तरुण भारतने 3 महिने अगोदर पूल व जोड रस्ता या दरम्यान दरी वाढत आहे व जोड रस्त्याच्या बाजूचा खांब खाली जमिनीत रुतत असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्याचे वृत्त सचित्र प्रसिद्ध केले होते. त्यावेळी महामंडळाने तसे काहीही झालेले नाही, असे नमूद केले होते. तथापि जोड रस्त्याचा खांब अलिकडे जास्तच सरकल्याने जोड रस्ता आणि अटल सेतू पूल या दरम्यान गॅप वाढला आहे. आता अधिककाळ तो चालू ठेवणे म्हणजे मोठय़ा अपघाताला निमंत्रण देण्यासारखे होईल, याची जाणीव पायाभूत सुविधा महामंडळाला झाल्याने अखेर बंद करावा लागला आहे.
कंत्राटदार कंपनीला दिली माहिती
हा पूल उभारून तो वाहतुकीस खुला झाल्यास आता अडीच वर्षे लोटली. आणखी अडीच वर्षे पर्यंत पाच वर्षाची दिलेली हमी संपुष्टात येईल. तोपर्यंत या पुलाचे काहीही बिघडल्यास सारी जबाबदारी कंत्राटदार लार्सन ऍण्ड टुब्रो या कंपनीची ठरते. जोड रस्त्याचा खांब खाली सरकत असल्याने दोन महिन्यांपूर्वीच महामंडळाने त्यांना कळविले. परंतु मेरशीहून पणजीकडे जाणाऱया महामार्गाचे काँक्रीटीकरण केले जात असल्याने हे काम पूर्ण होण्याची महामंडळ वाट पहात आहे.
गेल्या 8 दिवसांपासून दरी वाढत असल्याने महामंडळाने साबांखात्याला रस्त्याचे काँक्रीटीकरण त्वरित पूर्ण करा असे कळविले आहे. तसेच वाहतूक पोलिसांकडे अटल सेतू पूल मेरशीच्या बाजूने बंद करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. फोंडा मार्गे येणाऱया गाडय़ा अटल सेतू वरून पर्वरीला जाऊ शकतात. मात्र मडगाव, वास्को भागातून येणाऱया गाडय़ांना पर्वरीला जाण्यास पणजीच्या मार्गे जाऊन मांडवी पुलावरून वाहने हाकावी लागणार आहेत. दुरुस्तीचे काम हाती घेऊन त्यावर कायम स्वरुपी उपाययोजना काढल्या जाणार असल्याने किमान 2 महिने तरी या पुलाचा मडगावच्या बाजूचा मार्ग बंद ठेवावा लागणार आहे.