प्रतिनिधी / सातारा :
वाई, खंडाळा तालुक्यातील घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांनी चार गुन्हे केल्याची कबुली दिली असून, पुढील तपासासाठी त्या चोरटयांना खंडाळा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
अकेला उर्फ अखिलेश टिमटिम्या भोसले, उमेश उर्फ उम्या इंजीन पवार(दोघे रा. खंडाळा) अशी अटक करण्यात आलेल्या दोन चोरट्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 8 जुलै 2021 रोजी खंडाळा परिसरात राहणाऱ्या पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांनी खंडाळा व वाई तालुक्यातील घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत, अशी माहिती खास खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकेला भोसले, उमेश पवार या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी 2, वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 घरफोडीचा भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 घरफोडीचा असे चार घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांना पुढील कार्यवाहीकरता खंडाळा पोलीस ठाणे गु.र.नं. भा.द.वि.स. 454,457, 380 या गुह्याच्या तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.