दोन लाखांच्या सात दुचाकी जप्त : आरोपी मूळचा संतिबस्तवाडचा
प्रतिनिधी / बेळगाव
एका अट्टल दुचाकी चोराला अटक करण्यात आली आहे. टिळकवाडी पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली असून त्याच्या जवळून 2 लाख रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये 5 होंडा डिओ व दोन होंडा ऍक्टिव्हांचा समावेश आहे.
दीपक देमाणी लोहार (वय 22, मूळचा रा. लक्ष्मी गल्ली, संतिबस्तवाड, सध्या रा. रामनगर, कंग्राळी के. एच.) असे त्याचे नाव आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, पोलीस उपनिरीक्षक एम. वाय. कारीमनी, मणिकंठ पुजारी, के. के. सवदत्ती, सय्यद गुडारद, एस. एम. कळ्ळीमनी, एस. ए. सावकार, मल्लिकार्जुन पार्तोट व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत स्वामी विवेकानंद कॉलनी, टिळकवाडी येथील अर्जुन एम्पायरसमोर उभी करण्यात आलेली केए 22 एचई 5884 क्रमांकाची दुचाकी चोरण्यात आली होती. यासंबंधी मोनेश तिळवी (रा. देवराज अर्स कॉलनी, बसवण कुडची) यांनी 21 नोव्हेंबर रोजी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती.
दुचाकी चोरी प्रकरणाचा तपास करताना गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दीपकला ताब्यात घेऊन संशयित आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने बेळगाव शहर व उपनगरांतून सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्या जवळून चोरीच्या 5 होंडा डिओ व दोन होंडा ऍक्टिव्हा अशा सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.