मार्केट पोलिसांची कारवाई, चार मोटार सायकली जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
मार्केट पोलिसांनी एका अट्टल मोटार सायकल चोराला अटक केली आहे. त्याच्या जवळून 1 लाख 95 हजार रुपये किंमतीच्या चार चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
चंद्रू मोहन हरिजन (वय 25, रा. रुक्मिणीनगर, पहिला क्रॉस, दुसरी गल्ली) असे त्याचे नाव आहे. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, पोलीस उपनिरीक्षक एम. एस. वठारे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
त्याच्या जवळून एक होंडा ऍक्टीव्हा, एक रॉयल एनफील्ड बुलेट, हिरो एचएफ डिलक्स व बजाज डिस्कव्हरी अशा चार दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकी त्याने बेळगाव व उपनगरांतून चोरल्याची कबुली दिली आहे. दोन दिवसांपूर्वी जुन्या पी. बी. रोडवरील भाजीमार्केट नजीक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.