अथणी पोलिसांची कारवाई, सात दुचाकी जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
अथणी पोलिसांनी एका अट्टल मोटार सायकल चोराला अटक करुन त्याच्या जवळून चोरीच्या सात मोटार सायकली जप्त केल्या आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली आहे.
पिरसाब राजेसाब कुपवाडी (वय 26, रा. कृष्णाकित्तूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या मोटार सायकल चोराचे नाव आहे. अथणीचे पोलीस उपअधिक्षक एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक शंकरगौडा बसनगौडर, पोलीस उपनिरीक्षक कुमार हाडकार, एम. डी. घोरी, एस. पी. सवदी, ए. ए. इरकर, आर. आर. वाघमोरे, एस. जी. मन्नापूर, के. बी. शिरुर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी 1 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या सात मोटार सायकली जप्त केल्या आहेत. हिरोहोंडा सीडीडिलक्स, हिरोहोंडा स्प्लँडर कंपनीच्या या मोटार सायकली असून काही मोटार सायकलींना तर पासिंगचे कमांकही नाहीत. भा.दं.वि. 379 कलमान्वये पिरसाबला अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.