केंद्र सरकारची घोषणा, 1 मे पासून योजना लागू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अठरा वर्षे वयावरील प्रत्येकजण लस घेण्यासाठी पात्र आहे, अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 मे पासून ही योजना लागू करण्यात येणार आहे. कोरोना लसीकरण योजनेच्या तिसऱया टप्प्यात हे धोरण अवलंबिण्यात येत आहे. आतापर्यंत 45 वर्षांवरील सर्वजण लसीसाठी पात्र होते. आता ही वयोमर्यादा कमी करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेणे आवश्यक होते, असे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
देशात लसींचा तुटवडा नाही. सध्या दोन लसी उपलब्ध आहेत. येत्या काही कालावधीत आणखी लसी उपलब्ध होतील. विदेशी लसींनाही भारताचे दरवाजे मोकळे करण्यात आले आहेत. लस निर्माण करणाऱया भारतीय कंपन्यांना मोठय़ा प्रमाणात अर्थसाहाय्य केले जाणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
लस निर्मिती मोठय़ा प्रमाणात
भारताची लोकसंख्या आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मोठय़ा प्रमाणात लस लागणार आहे. त्यामुळे त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार त्वरेने प्रयत्न करीत आहे. लस निर्मिणाऱया कंपन्यांना 4 हजार 500 कोटी रूपयांचे अनुदान देण्यात येईल. त्यामुळे लस निर्मितीचा वेग वाढून सर्वांना देता येईल, अशा प्रमाणात उत्पादन घेणे शक्य होईल, असे प्रतिपादन करण्यात आले.
अधिक धोकादायक नाही
कोरोनाचे नवे रूप वेगाने पसरणारे असले तरी त्यापासूनचा मृत्यूदर पहिल्या कोरोनाच्या तुलनेत जास्त नाही. कोरोनाच्या दुसऱया लाटेत प्राणवायूची आवश्यकता अधिक आहे. तथापि, या नव्या कोरोनाची लक्षणे अत्यंत पहिल्या कोरोनाच्या तुलनेत अत्यंत सौम्य आहेत. नव्या कोरोनामुळे श्वास घेण्यास अधिक अडचण निर्माण होताना दिसते. कोरडा खोकला, सांधेदुखी, डोकेदुखी, इत्यादी लक्षणे पहिल्या कोरोनात अधिक दिसत होती. नव्या कोरोनात ही लक्षणे अत्यल्प दिसतात. त्यामुळेच या लाटेत जास्त प्राणवायूची आवश्यकता लागणार आहे. मात्र, मृत्यूदराच्या संदर्भात दोन्ही लाटांमध्ये अंतर नाही, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
घाबरण्याचे कारण नाही…
नवा कोरोना वेगाने पसरणारा असला तरी मृत्यूचा धोका अधिक नाही
नव्या व पहिल्या कोरोनाची लक्षणे वेगवेगळी, नवा कोरोना जास्त सौम्य
नव्या कोरोनात श्वासाचा त्रास अधिक असल्याने प्राणवायू जास्त लागणार
कोरडा खोकला, सांधेदुखी, डोकेदुखी ही लक्षणे नव्या कोरोनात अत्यल्प