बेळगाव येथील सराफी व्यावसायिक हवालदिल
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव, कोल्हापूर, सांगली येथील सराफी व्यावसायिकांकडून सुमारे अडीच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कोल्हापूरचा एक युवक गेल्या महिनाभरापासून गायब झाला आहे. त्यामुळे विश्वासाने त्याला दागिने दिलेले सराफी व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
बेळगाव, शहापूर परिसरातील काही सराफांनी या युवकाला दागिने दिले आहेत. आठ दिवसांत परत येतो, असे सांगून एक महिन्यापूर्वी हा युवक गायब झाला असून सध्या त्याचा मोबाईलही स्वीचऑफ येत आहे. त्यामुळे आपण फसलो गेलो की काय, अशी शंका सराफी व्यावसायिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार बेळगाव शहरातून त्याने सुमारे दीड कोटी रुपयांचे तयार दागिने उचलले आहेत. दागिने घेऊन एक महिन्यापूर्वीच हा युवक गायब झाला असला तरी अद्याप कोणीही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. केवळ बेळगावच नव्हे तर कोल्हापूर-सांगली परिसरातही या युवकाने आपला प्रताप गाजविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बेळगाव येथील सराफी व्यावसायिकांकडे सोन्याचे तयार दागिने विकण्यासाठी कोल्हापूरचा एक युवक नेहमी येत होता. मोठय़ा प्रमाणात त्याची उलाढाल होती. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय थंडावला होता. तो कोल्हापुरातून तयार दागिने आणून बेळगाव येथील सराफी व्यावसायिकांना विकत होता. गेल्या महिन्यात हा युवक बेळगावला आला. लॉकडाऊनमुळे कोल्हापुरात दागिन्यांची उपलब्धता कमी आहे. हुबळी-धारवाड, शिरसी आदी कर्नाटकातील वेगवेगळय़ा शहरात पुरविण्यासाठी दागिने हवे आहेत, असे सांगून त्याने मोठय़ा प्रमाणात दागिने उचलले. दोन दिवसांत परत येण्याचे सांगून 6 सप्टेंबर रोजी तो येथून निघून गेला आहे. सध्या त्याचा मोबाईलही स्वीचऑफ आहे.
‘अमित’ची अशीही गुलाबी थाप!
बेळगावातील सराफी व्यावसायिकांकडे दागिने उचलताना दोन-तीन दिवसात आपण परत येणार आहे. मी आलो नाही तरी किमान आठ दिवस फोन करू नका, कारण एका तरुणीवर आपले प्रेम आहे. तिला घेऊन आपण बाहेर जात आहोत. त्यामुळे फोन करू नका. परत आल्यानंतर येऊन तुमचे व्यवहार पूर्ण करतो, असे या युवकाने सांगितले होते. त्यामुळे सुरुवातीला आठ-पंधरा दिवस कोणीही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. नंतर त्याला कॉल केला असता मोबाईल स्वीचऑफ होता. उपलब्ध माहितीनुसार ‘अमित’ असे त्या युवकाचे नाव असून त्याला विश्वासाने दागिने दिलेल्या सराफी व्यावसायिकांच्या काळजाचे ठोके चुकू लागले आहेत.