खणभाग पंचमुखी मारूती रोडवरील प्रकार, सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद
प्रतिनिधी / सांगली
शहरात पुन्हा एकदा धुम टोळीने आपले कारनामे सुरू केले आहेत. शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या पंचमुखी मारूती रोडवरील बिरंगे गल्लीत धुमस्टाईलने महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण लंपास केले. दुचाकीवरून भरधाव वेगाने येत महिलेच्या गळ्यातील गंठण खेचून नेले आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात आज गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, साक्षी सूरज बसगणवर वय 26, रा. कडलास्कर गल्ली, खणभाग, सांगली या सोमवारी संध्याकाळी त्यांच्या दिरासोबत सासूच्या घरी दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करत दोघेजण आले आणि बसगणवर यांना काही समजण्याच्या आधी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण या चोरट्यांनी पळवून नेले. बसगणर यांनी ही घटना घडल्यानंतर तात्काळ आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या चोरट्यांचा पाठलागही केला पण ते सापडले नाहीत. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या परिसरातील पोलीसांच्याकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.