प्रतिनिधी / लांजा
अडीज वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या वाकेड ते लांजा चौपदरीकरणाच्या कामाने गती घेतली असून वाकेड ते लांजा रेस्ट हाऊस या चौपदरीकरणाचे काम नोव्हेंबर अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये लांजा बाजारपेठेत चौपदरीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.
महामार्गाच्या वाकेड ते लांजा दरम्यान चौपदरीकरणसाठी चिंतामणी कंपनी साधन सामुग्रीसह लांजा येथे दाखल झाली आहे. पंधरा दिवसापूर्वी कंपनीने कुवे ते लांजा रेस्ट हाऊस पर्यंत काम हाती घेतले आहे. दिवाळी सणात स्थानिक व्यापाऱयांना अडचण होऊ नये या दृष्टीने लांजा बाजारपेठेत कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती. या कामाला डिसेंबर महिन्यात सुरुवात करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या लांजा शहरातील चौपदरीकरणाच्या कामाने गती घेतली आहे.