वार्ताहर / अणाव:
जीवन संजीवन सेवा ट्रस्ट संचलित आनंदाश्रम या अणाव (कुडाळ) येथील वृद्धाश्रमाच्या नव्या इमारतीचे व विशेष कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवार 21 फेब्रुवारीला होणार आहे. याप्रसंगी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदर वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, माजी आमदार परशुराम उपरकर, प्रमोद जठार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समाजातील गरजू आणि निराधार वृद्धांच्या सेवेसाठी लोकसहभागातून उभे राहिलेल्या या वृद्धाश्रमाचे विश्वस्त रघुवीर मंत्री यांनी त्यांच्या पत्नी कै. सौ. भारती मंत्री यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 36 खाटांची अद्ययावत इमारत या आश्रमासाठी उभारून दिली आहे. त्याचबरोबर या वृद्धाश्रमाच्या आणखी एक विश्वस्त सौ. वैशाली गावडे यांनी आपल्या मातोश्री कै. श्रीमती सरस्वती वारंग त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आठ बेडच्या विशेष कक्षाची इमारत उभारून दिली आहे. या दोन्ही इमारतींचा उद्घाटन सोहळा 21 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. सध्या कोरोनाचे संकट पूर्णपणे न टळल्यामुळे आणि वृद्धाश्रमाच्या बाबतीत अधिक खबरदारी घ्यावी लागणार असल्याने हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने होणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन हे निमंत्रितांसाठीच करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आनंदाश्रयाचे अध्यक्ष बबनकाका परब यांनी दिली.