प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेचा दि. 26 रोजी 2021-22 चा अर्थसंकल्प ऑनलाईन सभेद्वारे मांडण्यात आला आहे. त्या सभेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सातारा विकास आघाडीचे नगरसेवक अण्णा लेवे यांनी नगरपरिषद प्रशासनाचे संचालकांकडे केली आहे. त्यामुळे सातारा विकास आघाडीला घरचा आहेर सातारा विकास आघाडीचे नगरसेवक अण्णा लेवे यांनी दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पालिकेमार्फत 2021-22 च्या वर्षाच्या वार्षिक अर्थसंकल्पास मान्यता देण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाईन विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये विविध विषयांबाबत माहिती हवी होती. मी मिटींग अगोदर दि. 17 रोजी नगराध्यक्षा माधवी कदम यांना लेखी पत्र देवून विविध विषयावर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ देण्याबाबत विनंती केली होती. परंतु अर्थसंकल्पाच्या ऑनलाईन मिटिंगमध्ये मी बोलायला सुरुवात केल्यानंतर माझ्या माईकचा आवाज संगणक अभियंता अस्मिता पाटील यांच्यामार्फत बंद करण्यात आला. त्यामुळे मला माझे प्रश्न मांडता आले नाहीत. मी या सभागृहचा मागील 20 वर्षांपासून सत्तारुढ आघाडीचा अधिकृत सदस्य आहे. अशाप्रकारे वागणूक माझ्यासारख्या ज्येष्ठ सदस्याला देणे ही बाब अन्यायकारक व अशोभनिय आहे. पालिकेमार्फत सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत अनेक त्रुटी असून अर्थसंकल्पामध्ये अनेक बाबींवर चुकीच्या पद्धतीने तरतूदी दाखवण्यात आल्या आहे. अंदाजपत्रकात तयार करताना जिल्हाधिकाऱयांच्या मार्फत देण्यात आलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पामध्ये गोषवारा सादर केला नसल्याने हा अर्थसंकल्प तुटीचा अथवा शिलकीचा आहे हे कळू शकत नाही. तसेच हा अर्थसंकल्प सदस्यांना दि.22 रोजी संध्याकाळी 8 नंतर दिल्याने याबाबत पूर्ण अभ्यास करता आला नाही. नियमानुसार अर्थसंकल्प किमान सात दिवस अगोदर देणे गरजेचे आहे. तरी हा अर्थसंकल्प नामंजूर करण्याबाबत जिल्हाधिकाऱयांना जरुर ते आदेश व्हावेत, तसेच पालिकेचे संगणक अभियंता यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.