ऑनलाईन टीम / मुंबई :
सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. 14 फेब्रुवारीपासून अण्णा हजारे बेमुदत उपोषण करणार आहेत.
अण्णा हजारे यांनी वाईनविक्रीच्या निर्णयाविरोधात यापूर्वीही सरकारला उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून आमच्या साधूसंतानी, राष्ट्रीय महापुरुषांनी अतोनात प्रयत्न केला. दुकानांमध्ये वाईन आली तर ही संस्कृती धुळीला मिळेल आणि चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढीला लागेल. त्यातून काय काय अनर्थ घडतील सांगता येत नाही. ती अधोगतीकडे नेणारी संस्कृती पहायला नको म्हणून मी 14 फेब्रुवारी रोजी मी राळेगणसिद्धीमध्ये श्री संत यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषण करीत आहे, असे अण्णांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, अण्णांच्या या आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.