खासदार सुजय विखे पाटील यांची स्पष्टोक्ती : लवकरच मार्ग निघणार
नगर / प्रतिनिधी :
महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या मागण्या योग्य आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय पातळीवर या संदर्भात पाठपुरावा सुरू असून लवकरच याप्रश्नी मार्ग निघेल, असे सुतोवाच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी रविवारी केले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी रविवारी राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. मागील काही दिवसांपासून अण्णा हजारे यांनी निर्भया प्रकरणातील आरोपीबाबत कठोर कायदे व्हावेत यासाठी मौनव्रत आंदोलन सुरू केले आहे. याबाबत खासदार डॉ. विखे यांनी हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, राहुल शिंदे, सुभाष दुधाडे, उपसरपंच लाभेष औटी, सुरेश पठारे आदी उपस्थित होते.
तोडग्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न
मागील तीन आठवडय़ापासून अण्णांचे मौनव्रत सुरू आहे. दरम्यान, निर्भयाच्या गुन्हेगारांना येत्या 22 जानेवारी रोजी फाशी देण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. अण्णांच्या महिला अत्याचाराविरोधात कठोर कायदा व इतर मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याशी आपण संपर्क साधला आहे. त्यांच्या माध्यमातून केंद्राशी चर्चा करून याप्रश्नी तोडगा काढला जाईल, असे डॉ. विखे पाटील यांनी नमूद केले.