रस्त्याचे काम रखडल्याने सुळगे ग्रामस्थांचा इशारा
वार्ताहर /उचगाव
सुळगे-हिंडलगा येथील ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया गल्ल्यांमधून खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाला आमदार फंडातून प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र, शंकर गल्लीतील रस्त्याचे काम काही नागरिकांनी अतिक्रमण केल्याने रखडले आहे. तरी या रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने काढून रस्त्याचे काम पूर्ण करावे. अन्यथा, ग्राम पंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा येथील संतप्त नागरिकांनी दिला आहे.
आमदार फंडातून सुळगे गावातील रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरण कामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि पहिली कुदळ मारून करण्यात आला. गावातील रस्त्यांचे खडीकरण आणि डांबरीकरण सुरू करण्यात आलेले आहे. मात्र, शंकर गल्लीमधील अंदाजे सहाशे फूट लांबीच्या रस्त्यावर काही नागरिकांनी संरक्षक भिंत व संडास बांधून अतिक्रमण केले आहे.
ग्राम पंचायतकडून कोणतीही कार्यवाही नाही
ही अतिक्रमणे हटवून रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशा आशयाचे निवेदन सुळगा ग्राम पंचायतीला नागरिकांनी दिले आहे. मात्र, अद्याप याबाबत ग्राम पंचायतीने कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने व रस्त्याचे काम रखडल्याने येथील रहिवाशांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अतिक्रमण तातडीने हटवून या रस्त्याचे काम सुरू करावे. अन्यथा, ग्राम पंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. तरी या भागाच्या आमदार तसेच ग्राम पंचायतीने तातडीने यात लक्ष घालून या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.