प्रतिनिधी/ बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकासमोरील महापालिकेच्या व्यापारी संकुलाचे नूतनीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली चालविल्या आहेत. पण काही हातगाडीवाले संकुलाच्या आवारात हातगाडे लावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्यावतीने हातगाडय़ा हटविण्याचा प्रयत्न झाला. पण सदर हातगाडी चालकांनी अधिकाऱयांना शिवीगाळ करून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कारवाई न करताच मनपाचे कर्मचारी परतले.
अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या पथकावर हल्ला करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. गुरुवारी हा प्रकार पुन्हा एकदा घडला असून, अतिक्रमण हटविण्याची कारवाई अर्ध्यावर सोडून परत जाण्याची वेळ मनपा कर्मचाऱयांवर आली. शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण होत असते. रस्त्याशेजारी फेरीवाले ठाण मांडून अडचण निर्माण करतात. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथकाच्यावतीने अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येते. पण मनपा कर्मचाऱयांवर धावून जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर ऑम्लेट पावची हातगाडी लावून व्यवसाय करायचा आणि त्यानंतर महापालिकेच्या व्यापारी संकुलाच्या आवारात हातगाडी ठेवून घरी जाण्याचा प्रकार एका व्यावसायिकाने चालविला होता. सदर व्यावसायिकाला हातगाडी हटविण्याची सूचना गाळेधारकांनी केली होती. याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकासमोरील व्यापारी संकुलाच्या आवारात ठेवण्यात आलेली हातगाडी हटविण्याचा प्रयत्न गुरुवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केला. मात्र हातगाडी मालकाने धाव घेऊन हातगाडी हटविण्यास आक्षेप घेतला. अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कर्मचाऱयांसह महसूल निरीक्षकांबरोबर वाद घातला. हातगाडी हटविणाऱया कर्मचाऱयांवर धावून जाण्याचा प्रयत्नदेखील केला. त्यामुळे मनपा कर्मचाऱयांनी कारवाई मागे घेत तेथून काढता पाय घेतला. सदर माहिती महापालिका आयुक्तांना देऊन कायदेशीर मार्गानेच कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका व्यापारी संकुलाच्या आवारातच हातगाडी लावून मनपा अधिकारी व कर्मचाऱयांवरच धावून जाण्याचा प्रयत्न केल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. हातगाडी व्यावसायिक संतापल्याने मनपाचे कर्मचारी कारवाई सोडून परतले.
अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या कर्मचाऱयांवर धावून जाण्याचा प्रकार वारंवार होत असतो. पण याबाबत ठोस अशी कोणतीच कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची कारवाई थांबविण्यात आली आहे. गुरुवारी घडलेल्या घटनेनंतर महापालिका आयुक्त जगदीश के. एच. कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.