प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणूकीत सराईत गुन्हेगारांकडून कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याची कृत्ये होऊ शकतात.या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांचे पोलीस रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. गंभीर व अतिगंभीर गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तर 60 गुन्हेगारांना तडीपार केले जाणार आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांना दिली.
पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले,महापालिकेची निवडणूक अगदी चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.निवडणूकीसाठी अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन होऊन निवडणूका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलीस दलाने जानेवारी पासूनच तयारी सुरू केली आहे.जिल्हयातील सराईत गुन्हेगार, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्हयातील आरोपींची यादी तयार केली आहे.
सराईत व ज्यांच्यापासून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा गंभीर व अतिगंभीर 60 गुन्हेगारांना जिह्यातून तडीपार केले जाणार आहे. तडीपार केलेले गुन्हेगार जिह्यात येणार नाहीत याची दक्षता शहर पोलीस उप-अधीक्षक व करवीर उप-अधीक्षक यांनी घ्यावी अशा सुचनाही बैठकीत केल्या आहेत. सात ते आठ टोळ्यांना मोक्का लागणार असून त्यांची यादी तयार केली आहे. मोक्का कारवाईचे प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवण्यात आले आहेत. इतर गंभीर गुह्यातील 48 गुन्हेगारांनाही जिह्यातून बाहेर हद्दपार केले जाणार असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.