प्रतिनिधी / बेळगाव :
कोरोनामुळे अतिथी शिक्षक, प्राध्यापक यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन नाही. त्यामुळे आम्हाला इतरांप्रमाणे पॅकेज द्यावे, या मागणीसाठी जिल्हा अतिथी शिक्षक, प्राध्यापक आंदोलन समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले. यावेळी आम्हाला तातडीने वेतन द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आम्हाला नोकरीत कायम स्वरुपी सामावून घ्यावे, गेल्या 15 ते 20 वर्षांपासून अतिथी शिक्षक म्हणूनच काम करत आहे. आम्हाला प्रतिमहिना सात हजारपासून 15 हजारपर्यंतच वेतन देण्यात येत आहे. इतर राज्यात मात्र 50 ते 60 हजार रुपये वेतन देण्यात येत आहे. तेंव्हा त्याच प्रकारे आम्हालाही वेतन द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे आम्हाला वेतन देण्यात आले नाही. इतरांना मात्र विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. आमच्यावर अन्याय झाला आहे. तेंव्हा त्याचा गांभीर्याने विचार करुन आम्हाला पॅकेज द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राजू गाणगी, नागराज कोटी, आनंद बेळगावी, नंदीश कराळे, आडव्याप्पा इटकी, बी. एम. अदुगोळ, लक्काप्पा बिज्जण्णावर यांच्यासह अतिथी शिक्षक उपस्थित होते.