आलिशान मालमत्तेची विक्री 230 टक्क्यांनी वाढली
लंडनचे क्रिस्टोफ रीच यांनी कोरोना महामारीमुळे वैतागून स्वतःचे लक्झरी टाउनहाउस विकले आणि दुबईत स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिस्टोफसारखे जगातील अनेक अतिधनाढय़ांच्या गुंतवणुकीमुळे दुबईत मालमत्तांची विक्री आणि किमतीत विक्रमी तेजी आली आहे.
2021 च्या पहिल्या तिमाहीत दुबईच्या अप-स्केल, हाय एंड, सुपर लक्झरी मालमत्तांची खरेदी मागील वर्षाच्या तुलनेत 230 टक्क्यांनी वाढली आहे. आलिशान मालमत्तांच्या किमतीही 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. एप्रिलमध्ये 20 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेल्या 90 मालमत्तांची विक्री झाली आहे. मार्च महिन्यात अशा 84 मालमत्तांचा व्यवहार झाला आहे.
लोक कुठलाही मोलभाव न करता मोठय़ा संख्येत मल्टीमिलियन डॉलर्सच्या मालमत्ता खरेदी करत आहेत. किमान व्याजदरांमध्ये कर्जाची उपलब्धता आणि कुटुंबासाठी मोठय़ा घराच्या इच्छेने न्यूयॉर्क आणि पॅरिस यासारख्या शहरांमधील धनाढय़ दुबईच्या दिशेने वळले आहेत. सुरक्षा, गुन्हेगारीवर पूर्ण नियंत्रण, उत्तम शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था देखील याचे प्रमुख कारण आहे. तसेच कोरोना काळात सुरक्षित दुबईनेही गुंतवणुकदारांना आकर्षित केले आहे.
विदेशी गुंतवणूकदारा आता दुबईच्या पाटर्य़ा, समुद्र किनारे, हॉटेल-रिसॉर्ट्स आणि नाइट-लाइफचा आनंद घेत आहेत. दुबईत मालमत्ता खरेदी करताच रहिवाशाचा दर्जा मिळणे आणि त्वरित कोरोना लस उपलब्ध होत आहे. पाम जुमेराह आणि अन्य मालमत्तांच्या व्यवहारात मोठा हिस्सा युरोप, भारत आणि चीनचा आहे.