आयर्लंडच्या कौंटीमध्ये बायरन नदीच्या उत्तरेला ड्रोघेडा येथे असलेल्या स्मारकामागाचे गूढ अजून उलगडलेले नाही. या प्रागैतिहासिक स्मारकाचे नाव ‘न्यू ग्रेंज’ असे असून नवपाषण काळात ते उभारले गेले असावे असा अंदाज आहे. हे स्मारक अतिशय भव्य असून अतिप्राचीन स्टोन हेंज पेक्षाही 500 वर्षे जुने आहे. इसवी सन पूर्वी 3,200 वर्षे या स्मारक निर्मितीचा दावा केला जात आहे. दुरून पाहताना ते एखाद्या गोलाकार टेकडीप्रमाणे दिसते. या अतिविशाल स्मारकात आत जाण्यासाठी दगडी रस्ता आणि काही खोल्या आहेत. येथे माणसांची हाडे आणि कबरीसाठी लागणारे साहित्य मिळाले होते. या स्मारकाच्या उत्खननात अर्धवट जळलेली हाडे मिळाली होती. त्यावरून येथे मानवी प्रेते ठेवली जात असावीत असा तर्क काढला गेला. कदाचित हे अंतिम संस्कार केंद्र असावे असेही म्हटले जाते.
जगभरात कोटय़वधींच्या संख्येने स्मारके आहेत. त्यातील काही अतिप्राचीन आहेत. बहुतेक स्मारकांचे निर्माण कालावधी आणि ती कुणी उभारली याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. मात्र, ‘न्यू ग्रेंज’चे रहस्य अजूनही गुलदस्त्यातच आहे. पुरातत्व तज्ञाच्या मते या स्थळाचे काही धार्मिक महत्व असावे. त्यासाठी काही विशिष्ट पूजा येथे केल्या जात असाव्यात. मात्र हे स्मारक कुणी उभारले याचा काहीही तपास लागत नाही.