कोरोनामुळे जिल्हय़ात दोघांचा मृत्यू : आणखी 22 पॉझिटिव्ह : कोरोना सक्रिय 599
- जिल्हय़ात एकाच दिवशी 27 जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा रुग्णालयातील यापूर्वी चार डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हय़ात सोमवारी 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर जिल्हय़ात कोरोना रुग्ण वाढत असताना सोमवारी कोरोना बाधित रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले. 27 जणांना एकाचवेळी डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच फोंडाघाट व सिंधुदुर्गनगरी येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयामध्ये सुरुवातीलाच एका नर्सला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील वॉर्डबॉय आणखी काही नर्स आणि त्यानंतर चार डॉक्टर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर अतिरिक्त ताण वाढणार आहे.
जिल्हय़ात गेला महिनाभर कोरोना बाधित रुग्णसंख्येचा आलेख वाढतच चालला आहे. कोरोनामुक्तांची संख्याही वाढत आहे. सोमवारी कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक होते. सोमवारी 22 जण कोरोना बाधित आढळले, तर 27 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हय़ात आता एकूण रुग्णसंख्या 1287 झाली आहे. तर एकूण 668 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात कोरोना सक्रिय 599 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. फोंडाघाट येथील 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच मूळ शिवापूर येथील व सध्या सिंधुदुर्गनगरी येथे राहणाऱया 53 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात आतापर्यंत कोरोनामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 13557
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 1287
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 12166
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 104
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 599
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 21
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 668
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 10999
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 11115
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 207299
सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 184