ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमध्ये चेकिंगदरम्यान पोलीस अधिकारीच अतिरेक्यांच्या कारमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱयाला अटक करण्यात आली आहे.
देविंदर सिंह असे या पोलीस अधिकाऱयाचे नाव असून, ते जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर सैय्यद नवीद मुश्ताक उर्फ नवीद बाबू आणि आसिफ राथर अशी या अतिरेक्यांची नावे असून, ते हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चेकिंग सुरू असताना हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन अतिरेक्यांसोबत देवेंदर सिंह आढळले. ते अतिरेक्यांना दिल्लीत घेऊन जाण्यासाठी मदत करत होते. दरम्यान, सिंह यांना अटक केल्यानंतर तात्काळ त्यांच्या घरी छापा मारण्यात आला. त्यावेळी त्यांच्या घरी 5 ग्रेनेड आणि 3 एके 47 सापडल्या आहेत. पोलीस उपमहानिरीक्षक अतूल गोयल यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
देवेंदर सिंह यांना मागील वर्षी 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पुरस्काराने गौवरविण्यात आले होते. देवेंदर सिंह यांच्या अतिरेक्यासोबतच्या संबंधाबाबत कसून चौकशी करण्यात येत आहे.