वार्ताहर /उचगाव
अतिवाड गावातील प्रतिष्ठित कुळापैकी गावडे कुळाच्यावतीने कुलदैवत ज्योतिर्लिंग कुळ वास्तुशांती व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा पुरोहित वेदशास्त्र संपन्न प्रकाश गणपती सांगळे व कृष्ण जयसिंग सांगळे व सहकारी कोल्हापूर यांच्या मंत्रघोषात शनिवार दि. 19 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. सोमवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी स्थापित देवता पूजन व 108 औषधी कलश स्थान, मूर्ती मंदिरात बसविणे, सर्व प्रकारच्या विधी तत्त्व प्रतिष्ठा, सर्व प्रकारचे होम, विशेष होम प्राणप्रतिष्ठा, क्षेत्रपाल बलिपूर्णाहुती, आरती आणि सत्यनारायण पूजा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. 19 रोजी श्री ज्योतिर्लिंग मूर्तीची भव्य मिरवणूक सकाळी 10 वाजता श्री सातेरी देवी मंदिरापासून सुरू होऊन गावातून वाजत गाजत हनुमान मंदिरापर्यंत आणण्यात आली. रात्री गणपत गल्ली भजनी मंडळातर्फे जागर भजन करण्यात आला.
रविवारी विविध पूजा कार्यक्रम झाला. सोमवारी दुपारी 1 ते 4 या वेळेत महाप्रसाद होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्यावतीने कळविण्यात आले आहे.