विविध ठिकाणी चेकपोस्टवर कडक तपासणी
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा हद्दीवर उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर वाहनधारकांची कसून चौकशी केली जात आहे. सोमवारी कोवाड-बेळगाव मार्गावर असलेल्या अतिवाड फाटय़ाजवळ वाहनधारकांची अडवणूक करून त्यांना माघारी धाडले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीमा हद्दीवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या चेकपोस्टवर मागील दोन दिवसांपासून कडक तपासणी सुरू आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात ये-जा करणाऱया प्रवाशांना आरटीपीसीआर किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. सोमवारी अतिवाड फाटय़ाजवळ वाहनधारकांची अडवणूक करण्यात आली. ज्यांच्याकडे आरटीपीसीआर नाही किंवा कोरोना प्रमाणपत्र नसलेल्यांना माघारी धाडले. त्यामुळे वाहनधारकांतून नाराजीचा सूर निघाला. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाय हाती घेत आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून जिल्हय़ाच्या सीमेवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमा हद्दीतील बाची, अतिवाड फाटा, राकसकोप, कोगनोळी नाका आदी ठिकाणी असलेल्या चेकपोस्टवर कडक तपासणी सुरू झाली आहे.
प्रवाशांना माघारी पाठविले…
बेळगाव-कोवाड मार्गावर सीमाभागातील जनतेची मोठय़ा प्रमाणात ये-जा असते. कोवाड, नेसरी, गडहिंग्लज भागातील वाहनधारकांची संख्या अधिक आहे. मात्र, पोलिसांनी कडक कारवाई हाती घेतल्याने महाराष्ट्रातील वाहनधारकांना माघारी परतावे लागले. बेकिनकेरेसह अतिवाड, आंबेवाडी, गोजगा, मण्णूर, उचगाव, बसुर्ते आदी भागातील गवंडी कामगार व इतर प्रवाशांची अतिवाड फाटय़ावर पोलिसांनी अडवणूक करून त्यांना माघारी पाठविले.