प्रतिनिधी / बेळगाव
अतिवाड येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत स्मार्ट स्वच्छतागृह बांधकामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रा. पं. सदस्य मल्लाप्पा पाटील व भरमा व्हरकेरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.
शाळांचा विकास होत असला तरी शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. येथील शाळेत जुने स्वच्छतागृह आहे. मात्र कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय व्हायची. याची दखल घेऊन नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांनी शाळेत स्मार्ट स्वच्छतागृह निर्मितीसाठी पुढाकार घेऊन शाळेच्या स्वच्छतागृहसाठी निधी मंजूर करून घेतला आहे. या स्वच्छतागृह निर्मितीसाठी 14 व्या वित आयोगातून 3 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्षा छब्बूताई कांबळे, उपाध्यक्षा गंगुबाई गावडे, सदस्य मल्लाप्पा पाटील, भरमा व्हरकेरी, विद्या पाटील, शांता मण्णूरकर, जोतिबा धायगोंडे, भावकू सावंत, बळवंत भोगण, राजू सावंत, लक्ष्मी सोमनाथ सावंत यासह एसडीएमसी अध्यक्ष उमेश पाटील, सदस्य विजय पाटील, लक्ष्मण बोकमुरकर, मुख्याध्यापक बी. एन. मुगळीकर, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.