वृत्तसंस्था/ बडोदा
भारताचे माजी क्रिकेटपटू अतुल बेदाडे यांची बडोदा वरिष्ठ महिला संघाच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. एका वरिष्ठ महिला क्रिकेटपटूने त्यांच्याविरुद्ध छळवणूक केल्याचा आरोप केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
मंगळवारी बडोदा क्रिकेट संघटना (बीसीए) कौन्सिलने त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या मार्चमध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते आणि संघटनेने त्यांची चौकशी सुरू केली होती. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यावर आरोप करणाऱया तक्रारदाराने आपली तक्रार मागे घेतली आणि मंगळवारी बीसीएने देखील त्यांचे निलंबन रद्द केले होते. तरीही या प्रकरणाची संवेदनशीलता आणि बीसीएचे हित विचारात घेऊन बीसीएने त्यांना डच्चू देण्याचा निर्णय घेतला. ‘काही महिला क्रिकेटपटूंनी त्यांच्यावर छळवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर बेदाडे यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. पण आता त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले असले तरी त्यांची सेवा यापुढे न घेण्याचा निर्णय बीसीएच्या कौन्सिलने घेतला,’ असे बीसीएच्या मीडिया समितीचे अध्यक्ष सत्यजित गायकवाड यांनी सांगितले.