पाहणाऱयांना येते चक्कर
जगात एकाहून एक विचित्र गोष्टी आहेत. एक अशीच जागा दक्षिण आफ्रिकेच्या ब्रोइडरस्ट्रूममध्ये आहे. जोहान्सबर्गपासून 45 मैल अंतरावर असलेल्या या ठिकाणी लोक येथे असलेले एक उलटसुलट घर पाहण्यासाठी येतात. आपल्या घरात काही वस्तू इकडच्या तिकडे झाल्या तर राग अनावर होतो, परंतु हे पूर्ण घरच उलटे झाले आहे, म्हणजे खालच्या गोष्टी वर आणि वरच्या गोष्टी खाली आहेत.
घराचे छत खाली तयार करण्यात आले आहे. तर घराचा पाया हवेत लटकलेला आहे. स्वतःच्या अनोख्या स्थापत्यकलेमुळे जगभरातील पर्यटक हे घर पाहण्यासाठी येत असतात. या घराला ब्राइट कलर्सनी सजविण्यात आले आहेत. काही पर्यटक याच्या सौंदर्याचे चाहते आहे तर काही जण याच्या स्थापत्यकलेमुळे चकित होतात. जोहान्सबर्गपासून 75 किलोमीटर अंरावर हर्टबीस्टपोर्टनजीक हे घर आहे. या भागातील हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
येथे येणारे पर्यटक चक्रावून जातात आणि स्वतःच्या कॅमेऱयांमध्ये अनोखी छायाचित्रे कैद करतात. घराच्या छताला लटकलेले सोफे आणि खुर्च्या आहेत. तर येथे उभे राहून कॅमेरा उलटा केल्यास अत्यंत गोंधळ उडविणारी छायाचित्रे प्राप्त होतात.
गुरुत्वाकर्षणाला निष्प्रभ ठरविणाऱया घरासाठी सर्व उपकरणांसोबत स्वयंपाकघर देखील उलटे करण्यात आले आहे. छायाचित्रे पाहून लोक उलटे उभे आहेत असे वाटेल, परंतु हे घरच उलटे असून लोक सरळ उभे असतात. हे घर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून सकाळी 9 वाजल्यापासुन संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तेथे जाता येते. घरात जाण्यासाठी तिकीट खरेदी करावे लागते आणि याच्या प्रमोशनसाठी एक इन्स्टाग्राम पेज तयार करण्यात आले आहे. यावर 9 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या पेजवर या उलटसुलट घराची अनेक छायाचित्रे दिसून येतील.