पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रम, अनेक पायाभूत प्रकल्पांचाही प्रारंभ
चेन्नई / वृत्तसंस्था
भारतनिर्मित अत्याधुनिक ‘अर्जुन’ रणगाडे भारतीय सेनेला अर्पण करण्याचा कार्यक्रम येथे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला आहे. एकंदर, 118 रणगाडे सेनेला देण्यात आले असून त्यांची किंमत 8 हजार 100 कोटी रुपये आहे, अशी माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली. या कार्यक्रमाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हे रणगाडे भारताच तयार करण्यात आले आहेत. त्यांच्यावर अत्याधुनिक संपर्क यंत्रणा, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे इत्यादी साधने असून त्यांचा वेग भारतातील कोणत्याही इतर रणगाडय़ांपेक्षा जास्त आहे. रशियाच्या टी 72 या रणगाडय़ात अनेक सुधारणा करून हे रणगाडे तयार करण्यात आले आहे. तसेच त्यांमधील 70 टक्क्यांहून अधिक भाग भारतीय बनावटीचे आहेत. त्य़ाची निर्मिती तामिळनाडूतील डीआरडीओच्या संशोधन व उत्पादन केंद्रात करण्यात आली आहे.
अनेक प्रकल्पांचा प्रारंभ
पंतप्रधान मोदी तामिळनाडू आणि केरळच्या दौऱयासाठी रविवारी येथे पोहचले. त्यांच्या हस्ते राज्यातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचा प्रारंभही करण्यात आला. त्यात चेन्नई येथील आयआयटी केंद्रातील संशोधन विभागाची निर्मिती, उत्तर चेन्नईत 9.1 किलोमीटरचा आणि 3 हजार 770 किलोमीटर लांबीचा वॉशरमनपेट ते विप्रो नगर हा रस्ता इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे.
केरळलाही भेट
या एक दिवसाच्या दौऱयात पंतप्रधान मोदी यांनी केरळलाही भेट दिली. कोची येथे त्यांनी 6 हजार कोटी रुपये खर्चाच्या पेट्रोलियम प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा प्रकल्प भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील तेलशुद्धीकरण कंपनीने सुरू केला आहे. यामुळे भारताची पेट्रोल व डिझेलची आवश्यकता काही प्रमाणात भागणार आहे. हा तामिळनाडूतील पहिलाच मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे.
सागरिकाचे उद्घाटन
केरळमध्ये येथे पंतप्रधान मोदींनी सागरिका या आंतरराष्ट्रीय पर्यटन सुविधेचे उद्घाटन केले. या सुविधेमुळे केवळ केरळमध्येच नव्हे, तर दक्षिण भारतात इतरत्रही पर्यटन व्यवसायाला लाभ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तामिळनाडूतील शेतकऱयांची प्रशंसा
तामिळनाडूतील शेतकऱयांनी कोरोना काळातही विक्रमी उत्पादन घेऊन दाखविले आहे. त्यांनी परिस्थितीचा योग्य विचार करून त्याप्रमाणे पीक योजना केली आणि मोठय़ा प्रमाणात अन्नधान्यांचे उत्पादन केले. त्यामुळे हे राज्य आता अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी शेतकऱयांचे कौतुक केले.
हेलिकॉप्टरमधून पाहिले क्रिकेट
सध्या चेन्नई येथे चेपॉक मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेट कसोटी सुरू आहे. तो खेळही पंतप्रधान मोदी यांनी हेलिकॉप्टरमधून पाहिला. यासाठी हेलिकॉप्टरने काही फेऱया या मैदानावरून मारल्या. त्यांनी एका स्टंपिंगचे व्हिडीओ चित्रणही आकाशातून केले, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.