अथणी शहरात 8, नदीइंगळगाव 2 तर एकजण जुगुळ येथील : तालुका प्रशासनाची धाकधूक वाढली
वार्ताहर/ अथणी
अथणी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मंगळवारी आणखी 11 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. अथणी शहरातील 8, नदीइंगळगावमधील 2 तर जुगुळे येथील एकाचा समावेश आहे. 11 कोरोनाबाधितांपैकी 6 पुरुष तर 5 महिलांचा समावेश आहे. एकूणच वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तालुका प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. अथणी शहरातील सर्व व्यवहार ठप्प असून पोलीस बंदोबस्त ठेवताना सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
नदीइंगळगाव येथील दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली आहे. 53 वर्षीय पती आणि 44 वर्षीय पत्नी आहे. नंदीइंगळगाव येथील सदर इसमाला दोन पत्नी आहेत. तो पंधरा दिवसांपूर्वी आपल्या पहिल्या पत्नीसह पुणे येथील दुसऱया पत्नीकडे गेला होता. ते तेथे आठ दिवस थांबले होते. दरम्यान आठ दिवसांपूर्वी सदर दाम्पत्य नदीइंगळगावला परतले होते.
दरम्यान लक्षणे आढळल्याने अथणी येथील खासगी रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतले होते. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता. यानंतर त्याने गावातील सरकारी रुग्णालयात उपचार घेतले. यावेळी येथील वैद्याधिकाऱयांनी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान बेळगाव येथे त्यांना रुग्णवाहिकेतून कोरोना कक्षात उपचारासाठी हलविण्यात आले. त्याच्या संपर्कात आलेल्या सरकारी दवाखान्यातील डॉक्टर आणि तिघा सहाय्यकांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
कागवाड तालुक्यातील जुगुळ येथील 45 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाल्याने तिला उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात आले आहे. याबरोबरच अथणी शहरातील मादर गल्लीतील 20 वर्षीय तरुण, हुलगबाळी रोड अथणी येथील 25 वर्षीय तरुणी, अथणी शहरातील 62 वर्षीय वृद्ध, 37 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय वृद्ध, 60 वर्षीय वृद्धा, गवंडी गल्लीतील 22 वर्षीय तरुणीचा समावेश आहे.