वार्ताहर/ अथणी, शिरगुप्पी
अथणी तालुक्यात 13 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने येथील एकूण रुग्ण संख्या 97 वर पोहचली असून तालुक्याचा कोरोनाबाधितांचा आकडा शतकासमीप आला आहे. रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी अथणी शहरातील 7, खिळेगाव, बाडगी, होसट्टी, किरणगी येथे प्रत्येकी एकाला लागण झाली आहे. तर कागवाड तालुक्यातील जुगूळ येथे दाम्पत्य आणि कृष्णाकित्तूर येथे एक जण असे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकूणच अथणी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या आकडय़ामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अथणी शहरात आणखी 7 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच अथणी शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस अथणीतील रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. तर तालुक्यातील खिळेगाव येथे 50 वर्षांच्या पुरुषाला, बाडगी येथे 25 वर्षीय महिला, होसट्टी येथे 48 वर्षीय पुरुष आणि किरणगी येथील 45 वर्षीय पुरुषाला बाधा झाली आहे. तर कागवाड तालुक्यातील जुगूळ येथे दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने जुगूळ येथील रुग्णसंख्या 3 वर पोहचली आहे. यात 40 वर्षीय पुरुष आणि 32 वर्षीय कोरोनाबाधित महिला आहे. त्यांच्या संपर्कातील 12 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच कृष्णाकित्तूर येथे एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्वांना बेळगावच्या सिव्हिल इस्पितळातील कोरोना कक्षात रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चार दिवसांपूर्वी येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. सदर महिलेला बेळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. येथे ग्राम पंचायतीकडून खबरदारी घेतली जात आहे. असे असतानाच रविवारी येथील दाम्पत्याचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर दाम्पत्य नजीकच्या तालुक्यातून 27 जून रोजी जुगूळ येथे आले होते. त्यांचा स्वॅब 4 जुलै रोजी घेण्यात आला होता. सदर अहवाल तब्बल आठ दिवसानंतर आला आहे. त्यात दोघेही पॉझिटिव्ह आढळले आहेत, यामुळे गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सदर दाम्पत्याला रुग्णवाहिकेतून बेळगाव येथील कोरोना कक्षात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.