क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
एसएसके समाज बेळगाव आयोजित समाज मर्यादित क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अथर्व सोलापूर संघाने गदग संघाचा 4 गडय़ांनी पराभव करून एसएसके चषक पटकावला. वैभव (गदग) याला मालिकावीर तर प्रशांत पवारला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सीन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत एसएसके गदग संघाने बेळगाव अ चा 8 धावांनी पराभव तर दुसऱया उपांत्य फेरीत अथर्व संघाने सोलापूर संघा 4 गडय़ांनी हरवून अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामन्यात एसएसके गदग संघाने 10 षटकात 9 बाद 82 धावा केल्या. विठ्ठल हबीबने 38 धावा केल्या. अथर्वतर्फे प्रशांत पवारने 16 धावात 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अथर्व सोलापूर संघाने 8.2 षटकात 6 बाद 83 धावा करत 4 गडय़ांनी सामना जिंकून अजिंक्यपद पटकाविले. प्रशांत पवारने 22 धावा केल्या.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अशोक चव्हाण, अनिल चौधरी, टी. डी. काटवा, विनायक सुर्यपान, महेश मिरजकर, नंदू मिरजकर यांच्या हस्ते विजेत्या अथर्व संघाला रोख 25 हजार रुपये, आकर्षक चषक तर उपविजेत्या एसएसके गदग संघाला 15 हजार रुपये, चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर प्रशांत पवार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक किरण मेहरवाडे, उत्कृष्ट झेल दीपक मेहरवाडे, उत्कृष्ट यष्टीरक्षक मंजू रायबागी, उत्कृष्ट संघ पुणे, उत्कृष्ट फलंदाज राजू खोडे, उत्कृष्ट गोलंदाज विनायक सिद्धलिंग, मालिकावीर वैभव (गदग) यांना चषक देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून सिद्धार्थ धोंगडी व दयानंद रंगरेज यांनी काम पाहिले.