दुसरे श्रीमंत : आयआयएलएल वेल्थ हुरुन इंडिया रिच यादी जाहीर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाने मागील 1 वर्षामध्ये दररोज हजारो कोटी रुपयाची कमाई केली आहे. या कारणास्तव 1 वर्षांपूर्वी त्यांची संपत्ती 1,40,200 कोटी होती जी वधारुन आता 5,05,900 कोटी रुपयाच्या घरात पोहोचली आहे. संपत्तीमध्ये झालेल्या मजबूत वाढीमुळे गौतम अदानी देशातील दुसऱया नंबरचे धनाढय़ व्यावसायिक बनले आहेत.
59 वर्षीय अदानी चीनचे व्यावसायिक झोंग शान शान यांना पाठीमागे टाकत आशियातील दुसरे धनाढय़ व्यक्ती राहिले आहेत, अशी माहिती आयआयएलएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 च्या आकडेवारीत दिली आहे.
गौतम अदानींच्या तुलनेत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींनी मागील 1 वर्षात दररोज 169 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अंबानी व रिलायन्स इंडस्ट्रीजची संपत्ती 1 वर्षात 9 टक्क्यांनी वधारुन 7,18,200 कोटी रुपयाच्या घरात पोहोचली आहे.
अदानींचे बंधुही श्रीमंतांच्या यादीत असे प्रथमच झाले आहे, की भारतीय व्यावसायिक गौतम अदानी आणि दुबईमध्ये वास्तव्यास असणारे त्यांचे बंधू विनोद शांतिलाल अदानी आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 च्या टॉपमध्ये समाविष्ट झाले आहेत. मागील वर्षात गौतम अदानी यांची संपत्ती ही 4 पटीने वधारली आहे. अदानी लिस्टमध्ये अव्वल स्थानी राहिले आहेत.