वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
30 जूनला संपलेल्या पहिल्या तिमाहीत अदानी ग्रीन एनर्जीला 21.75 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला असल्याचे सांगण्यात येते. एप्रिल-जून 2019-20 वर्षात कंपनी 97 कोटी रुपयांनी तोटय़ात होती.
कंपनीच्या एकूण उत्पन्नात मात्र 30 टक्के इतकी वाढ झाली आहे. हे उत्पन्न आता 878.14 कोटी रुपये झाले आहे, जे मागच्या वर्षी याच कालावधीत 675.23 कोटी रुपये इतके होते. कंपनीच्या निर्यातीत 24 टक्के इतकी लक्षणीय वाढ दिसली आहे. वर्षागणिक पाहता जूनअखेरच्या तिमाहीत 1 हजार 382 मेगावॅट ऊर्जा निर्यात केली गेली. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून ऊर्जेची मागणी वाढत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. जास्तीत जास्त स्वच्छ ऊर्जा देण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. सोलार ऊर्जा विकासात कंपनीने जागतिक स्तरावर मोठे नाव कमावले आहे. जागतिक स्तरावर मोठय़ा प्रकल्पांची ऑर्डरही याआधी कंपनीने घेतली आहे. जागतिक स्तरावर सर्वात मोठी सोलार ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी असा मान कंपनीला मिळवायचा असल्याचे सांगण्यात आले.