मागील तीन दिवसांपासून सलगची घसरण – अदानी ट्रान्समिन, अदानी पॉवर आणि अदानी टोटल गॅस यांचा समावेश
मुंबई
अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग हे मागील तीन दिवसांपासून घसरणीत राहिले आहेत. यामध्ये तीन कंपन्यांचे समभाग सलगचे घसरणीत राहिले असून लोअर सर्किट लागले होते. घसरणीमध्ये सदरच्या कंपन्यांमध्ये अदानी ट्रान्समिन, अदानी पॉवर आणि अदानी टोटल गॅस यांचा समावेश आहे.
अदानी समूहातील कंपन्यांचा तीन विदेशी गुंतवणूकदारांकडून पैसा गोठवला असल्याच्या बातमीमुळे सोमवारी समभागांमध्ये घसरण झाली होती. सोमवारी अदानी एंटरप्राईजेसचा समभाग 22 टक्क्यांनी घसरला होता. यासह लिस्टेड पाच कंपन्यांचे समभाग पाच ते 15 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे पहावयास मिळाले आहे.
बाजारमूल्यात 86 हजार कोटीची घट
सदरच्या घसरणीमुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या बाजारमूल्यात तीन दिवसांमध्ये 86 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची घसरण झाली आहे. शुक्रवारी सर्व लिस्टेड सहा कंपन्यांचे बाजारमूल्य 9.42 लाख कोटी रुपयावर होते. जे बुधवारी 8.56 लाख कोटी रुपये राहिले.
गुंतवणूकदार राहिले लांबच
या सर्व कालावधीत गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांसह अन्य गुंतवणूकदारांनी आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसेच आपली गुंतवणूक करतानाही यांनी चाचपणी केली असल्याचे पहावयास मिळाले आहे.