टाटा, रिलायन्सशी देणार थेट टक्कर : ट्रक, बसची निर्मिती, अदानीचा ट्रेडमार्क झाला रजिस्टर
वृत्तसंस्था/ मुंबई
पोर्टसह ऊर्जा क्षेत्रात विस्तार झालेला अदानी समूह आता इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात उतरण्याची तयारी करत आहे. यांच्याकरीता कंपनीने अदानी नावाने ट्रेडमार्क नोंदणीकृत केला असल्याची माहिती आहे.
इलेक्ट्रिक वाहनाच्या क्षेत्रात उतरण्याचा पहिला प्रयत्न कंपनीचा असेल. सदर योजनेच्या घोषणेनंतर अदानी समूह कंपनी ग्रीन एनर्जीचे समभाग शुक्रवारी एक वर्षाच्या उच्चांकावर जात 1,990 रुपयांवर पोहोचले आहेत. यासोबतच कंपनीचे बाजारमूल्य 3 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असल्याची नोंद करण्यात आली आहे. समूहातील जवळपास 6 लिस्टेड कंपन्यांमध्ये ही पहिली कंपनी आहे, की जी 3 लाख कोटी रुपये मूल्याची बनली आहे. ही कामगिरी बाजारातील चार दिवसांच्या सलगच्या घसरणीत नोंदली गेली आहे.
भारतामधील दुसऱया नंबरचे सर्वात श्रीमंत व्यावसायिक गौतम अदानी यांची कंपनी अदानी ट्रेडमार्कचा उपयोग आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी करण्यात येणार आहे. समूह अगोदरच इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. यामध्ये कोचेस, बस आणि ट्रक आदी वाहनांचा समावेश राहणार आहे.
विमानतळ क्षेत्रातही
साधारणपणे अदानी समूह पोर्ट आणि विमानतळ या क्षेत्रामध्ये राहिला आहे. ज्यामध्ये व्यावसायिक वाहनांची गरज लागणार आहे. याच कामासाठी कंपनीने आपल्या उत्पादनाचा वापर करणार असल्याची माहिती असून यामध्ये बॅटरी निर्मितीसह देशभरात चार्जिंग स्टेशन्सही उभारणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
70 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
अदानी समूहाने मागील वर्षात नोव्हेंबरमध्ये म्हटल्याप्रमाणे 70 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक नवीन एनर्जी व्यवसायात करणार आहे. सदरची रक्कम आगामी दहा वर्षात खर्च करण्यात येणार आहे.