कोरोना विषाणू संसर्गासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन, जागतिक रुग्णसंख्या 1 कोटी 54 लाखपार
कोरोना विषाणू बाधितांची संख्या जगभरात झपाटय़ाने वाढत असली तरी अद्याप समूह प्रतिकारशक्ती विकसित झालेली दिसत नाही, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. जेव्हा कोणताही संसर्ग मोठय़ा प्रमाणावर पसरतो, तेव्हा आपोआप मानवी शरीरात त्या रोगाशी लढण्याची क्षमता निर्माण होते. त्याला समूह प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) असे म्हणतात.
विशेषत: विषाणू संसर्गामुळे जे आजार निर्माण होतात त्यांचे प्रमाण विशिष्ट मर्यादेबाहेर गेल्यास अशाप्रकारची समूह प्रतिकारशक्ती निर्माण होते, असा अनुभव आहे. जे लोक मुळात निरोगी असतात त्यांच्यात ही प्रतिकारशक्ती अधिक वेगाने आणि अधिक प्रमाणात निर्माण होते. तथापि, वयस्कर लोक किंवा दुर्धर आजाराने आधीच ग्रासलेले लोक यांच्यात अशी समूह प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही, असे वैद्यकीय अभ्यासक व संशोधकांचे निरीक्षण आहे.
अर्धे बाधित तीन देशांमध्ये
अमेरिका, ब्राझिल आणि भारत या तीन देशांमध्ये जगातील एकंदर कोरोना रुग्णांपैकी जवळपास निम्मे रुग्ण आहेत. त्यामुळे या देशांमध्ये समूह प्रतिकारशक्ती लवकर विकसित होईल, असे अनुमान व्यक्त करण्यात येत होते. मात्र, अद्याप या तीन देशांमध्येही अशा प्रकारची प्रक्रिया विकसित होताना दिसत नाही. ती केव्हा सुरू होईल, याविषयी निश्चित अनुमान काढणे संशोधकांसाठीही अवघड आहे. उपचारांच्या कमतरतेमुळे काही देशांमध्ये कोरोनाचा झपाटय़ाने प्रसार झाल्यास तेथे समूह प्रतिकारशक्ती लवकर निर्माण होऊ शकते, असेही मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
विविध मतांतरे
काही संशोधकांच्या मते एखाद्या मानव समूहात 50 टक्क्मयांहून अधिक लोकांना एकाच विषाणू संसर्गाने ग्रासले असता समूह प्रतिकारशक्ती निर्माण होते तर काही तज्ञांच्या मते यासाठी 10 टक्के प्रमाण पुरेसे आहे. हे प्रमाण त्या समाजातील सर्वसाधारण रोगप्रतिकारशक्तीवर अवलंबून
आहे.
कृत्रिम समूह प्रतिकारशक्ती
मोठय़ा प्रमाणावर लसीकरण कार्यक्रम हाती घेतल्यास समूह प्रतिकारशक्ती कृत्रिमरीत्या निर्माण करता येते. देवी, नारू, क्षयरोग इत्यादी रोगांवर अशाच कृत्रिमप्रकारे लसीकरण करून नियंत्रण मिळवता आलेले आहे. कोरोनाची लस लवकरात लवकर लोकांसाठी उपलब्ध झाल्यास समूह प्रतिकारशक्ती लवकर निर्माण होण्याची शक्मयता आहे.
5 ते 10 टक्मक्मयांमध्ये प्रतिजैविके
कोणत्याही जीवाणू किंवा विषाणूचा संसर्ग झाल्यास त्यांचा प्रतिकार करण्यासाठी शरीर प्रतिजैविके (अँटीबॉडीज) तयार करते. रक्ततपासणी करून या प्रतिजैविकांचे प्रमाण निश्चित करता येते. त्यावरून किती प्रमाणात संबंधित व्यक्तीला विशिष्ट रोगाचा संसर्ग झाला आहे, हे समजून येते. त्यानुसार औषध योजना केली जाते. सध्याच्या कोरोना विषाणूने (कोव्हिड-19) जगातील 5 ते 10 टक्के लोकांमध्ये प्रतिजैविके निर्माण केली आहेत, असे निरीक्षण आरोग्यतज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी नोंदविले आहे. काही देशांमध्ये हे प्रमाण लोकसंख्येच्या 20 टक्के आहे.
एप्रिलनंतर प्रथमच
सोल : दक्षिण कोरियामध्ये एप्रिलनंतर प्रथमच शंभर नवे रुग्ण आढळले असून सरकारने त्वरित त्यांना विलगीकरणात टाकले आहे. या देशात एप्रिलमध्ये कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणावर झाला होता. तथापि, लॉकडाऊनसारखी कठोर उपाययोजना त्वरित लागू केल्याने मे आणि जूनमध्ये तसेच जुलैच्या मध्यापर्यंत नवे रुग्ण दिसून येत नव्हते. मात्र, जुलैच्या अखेरीस पुन्हा काही भागात संसर्ग दिसून आल्याने प्रशासनाने स्थिती हाताबाहेर जाऊ न देण्यासाठी तातडीची उपाययोजना केली आहे. या देशात आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 14 हजारपेक्षाही कमी असून मृतांची संख्या 300 हून कमी आहे.
जपानमध्ये संसर्ग वाढला
टोकियो : जपानमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले असून अनेक शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढीला लागली आहे. एकंदर रुग्णसंख्या 28 हजारपर्यंत पोहोचली असून मृतांची संख्याही लवकरच हजारापार जाईल, अशी शक्मयता आहे. तरीही लोकसंख्येची एकंदर घनता लक्षात घेता जपानमध्ये या रोगाचा प्रसार प्रारंभापासूनच नियंत्रणात आहे, असे तज्ञांचे मत आहे.
रिपब्लिकन प्रचारसभा रद्द
न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी फ्लोरिडा प्रांतात आयोजित करण्यात आलेली प्रचारसभा कोरोना संसर्गामुळे रद्द करावी लागली आहे. ही सभा प्रथम उत्तर कॅरोलिना प्रांतात होणार होती. तथापि, ऐनवेळी ती फ्लोरिडा येथे घेण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, सध्या कोरोनाच्या धास्तीमुळे लोक घराबाहेर पडण्यास अनुत्सुक आहेत. 3 नोव्हेंबर 2020 या दिवशी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. मात्र, कोरोनाच्या फैलावामुळे राजकीय पक्षांना अद्यापही प्रचाराचा प्रारंभ करता आलेला नाही. ऑगस्टच्या मध्यानंतरच प्रचाराला रंगत चढेल, असे मानण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेत शाळा बंद
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका या देशात एकंदर रुग्णसंख्या 4 लाखाहून अधिक झाल्याने येथील शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एक महिन्यापूर्वी परिस्थिती स्थिरस्थावर आहे असे समजून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, आता खबरदारीचा उपाय म्हणून त्या बंद करण्यात आल्या. पालकांनीही या निर्णयाला प्रतिसाद दिला आहे.
रशियात रूग्णसंख्येत घट
मॉस्को : रशियात कोरोना बाधितांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसत आहे. जून महिन्यातील महाउद्रेकानंतर जुलैत रूग्णसंख्या वाढीचा वेग 30 टक्के घटला आहे. मृत्यू दरातही घट झाली असल्याने परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे. घट होण्याचे हे प्रमाण स्थिर राहिल्यास हा देश लवकरच कोरोनावर मात करू शकतो.
चीनमध्ये नवे रुग्णसमूह
बीजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्ग पूर्णत: नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात येत असला तरी अद्यापही अनेक समूहांमध्ये या विषाणूचा फैलाव होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी झिनजियांग प्रांतात असा सामूहिक संसर्ग दिसून आला होता. तेथे अद्यापही नवे रुग्ण सापडत आहेत. त्याचबरोबर आता लिओनिंग प्रांतातही सामूहिक प्रसार दिसून येत आहे. त्यामुळे या प्रांतातील अनेक विभाग बंद करण्यात आले आहेत. बाजारपेठाही बंद झाल्या आहेत.