वेळप्रसंगी फॅक्टरी इन्स्पेक्टर, प्रभारी उपप्रादेशिक अधिकाऱयांचे निलंबनःसामंत
प्रतिनिधी/ चिपळूण
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीत स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत मृत व जखमींना कंपनी भरीव मदत देणार आहे. मात्र इतकी भीषण दुर्घटना घडूनही याकडे लक्ष न देणाऱया फॅक्टरी इन्स्पेक्टर व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकाऱयांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. वेळप्रसंगी त्यांना निलबित करण्याचा इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
या स्फोटानंतर सामंत यांनी कंपनीला भेट दिली व परिस्थितीची कंपनी व्यवस्थापक, अधिकाऱयांची बैठक घेतली. त्यानंतर चिपळुणातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण या कंपनीला भेट दिली. प्राथमिक चौकशीनुसार ही आग व स्फोट शॉर्टसर्कीटमुळे झाल्याचे पुढे आले आहे. तरीही त्याची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चिपळुणातील कार्यालय आठवडाभरात लोटेत नेण्याचे आदेश दोन दिवसात जारी होणार आहेत. कंपन्या तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती कंपन्यांवर केली जाणार आहे. लोटे पोलीस दूरक्षेत्राचा विस्तार करून पोलीस बळ वाढवले जाणार आहे. पोलीस व प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱयांना रात्रीची गस्त घालण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी कंपन्यांनी व्हीजीटीआय, आयसीटी व फेब्रिकेशनकडून वेळोवळी ऑडीट करून घेण्याच्या सूचनाही केल्या जाणार आहेत. या साऱया उपाययोजना तातडीने करून घेण्यासाठी महिनाभरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या येथे दौरा घडवून आणणार असून ते कंपन्या मालक, व्यवस्थापक व ग्रामस्थ यांच्या बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेतील असेही सामंत यांनी सांगितले.