प्रतिनिधी/ गडहिंग्लज
गडहिंग्लज नगरपरिषदेकडील जलअभियंता अनिल गंदमवाड यांना कार्यालयात येऊन काम करत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गडहिंग्लज शहर अध्यक्ष रामगोंडा उर्फ गुंडय़ा पाटील यांनी हुज्जत घालत शिवीगाळ केली. याबद्दल नगरपरिषदेच्या कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. अखेर मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना निवेदन देऊन चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरातील नदीवेस भागातील एका कुटुंबाच्या नळपाणी पुरवठय़ाच्या बिलाबाबत राष्ट्रवादी युवाचे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका सावित्री पाटील यांचे पती रामगोंडा उर्फ गुंडय़ा पाटील यांनी मंगळवारी सकाळी 11 च्या दरम्यान नगरपरिषदेच्या कार्यालयात येऊन जलअभियंता अनिल गंदमवाड यांना विचारणा केली. यावेळी वाद होऊन त्यांच्याशी हुज्जत घालून अर्वाच्च शिवीगाळ करत कामात अडथळा आणला. हा प्रकार समाजताच नगरपरिषदेच्या कर्मचाऱयांनी काम बंद करत नगरपरिषदेच्या दारात ठिय्या मारुन जोरदार घोषणाबाजी केली. गडहिंग्लज नगरपालिका कामगार युनियनचे शशिकांत मोहिते, सागर पाटील, राजू भुईंबर, अनिल चव्हाण, प्रकाश राठोड, सुधीर पोतदार, श्वेता सुर्वे, भारती पाटील, अवंती पाटील, रामा लाखे यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी सुरु झाली. काम बंद झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वीही रामगोंड उर्फ गुंडय़ा पाटील यांनी विविध विभागप्रमुखांशी असे कृत्य करत शासकीय कामात अडथळा आणला आहे. त्याचा निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधीतांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची जबाबदारी आपल्यावर राहील, असे निवेदन दिले. यावेळी मुख्याधिकारी मुतकेकर यांनी या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱयांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर दुपारी 1 पासून पालिकेचे कामकाज सुरळीत सुरु झाले.
आंदोलनाचा इशारा
नदीवेस भागातील काही कुटूंबांचे महापुरामुळे नळकनेक्शन बंद आहे. कनेक्शन बंद असताना बील कसे अशी विचारणा श्री. गंदमवाड यांच्याकडे केली असता उद्धट सवाल केला. आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली. याबाबत संबंधीत अधिकाऱयांना समज द्यावी. संघटनेचा गैरफायदा घेऊन कर्मचाऱयांना हाताशी धरुन अधिकारी नागरिकांची मुस्कटदाबी व गळचेपी करत असतील तर लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा रामगोंडा उर्फ गुंडू पाटील यांनी निवेदनातून मुख्याधिकारी यांना दिला आहे.