धर्माच्या आधारावर छळ केला जात असल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ हैदराबाद
एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तप्रदेशात कट्टरता फैलावण्याचा आरोप असलेले आयएएस अधिकारी इफ्तिखारुद्दीन विरोधातील एसआयटी चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धर्माच्या आधारावर छळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
उत्तरप्रदेश सरकारने वरिष्ठ आयएएस इफ्तिखारुद्दीन यांच्या 6 वर्षे जुन्या चित्रफितीच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली. हे सरकार सत्तेवर नसतानाची ही चित्रफित आहे. हा प्रकार धर्माच्या आधारावर छळ करणारा असल्याचे ओवैसी म्हणाले.
कुठल्याही अधिकाऱयाने धार्मिक कार्यात सहभाग घेऊ नये ही अट असल्यास कार्यालयांमध्येही सर्व धार्मिक प्रतीकं, तसविरींच्या वापरावर बंदी घातली जावी. घरात श्रद्धेबद्दल चर्चा करणे गुन्हा असल्यास सार्वजनिक धार्मिक उत्सवात भाग घेणाऱया कुठल्याही अधिकाऱयाला शिक्षा व्हावी असे उद्गार ओवैसी यांनी काढले आहेत.
कानपूरमधील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात धर्मांतराचे धडे दिले जात असतानाची चित्रफित व्हायरल झाली आहे. या चित्रफितीत एका विशिष्ट धर्माचे लोक जमा झाल्याचे दिसून येते. इफ्तिखारुद्दीन एका धर्मगुरुसह काही लोकांना एक विशिष्ट धर्म स्वीकारण्याचे लाभ सांगताना या चित्रफितीत दिसून येतात.
सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीचे अध्यक्ष जी.एल. मीणा असून कानपूर विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक भानू भास्कर याचे सदस्य आहेत. एसआयटी सात दिवसांच्या आत सरकारला स्वतःचा अहवाल देणार आहे.