सुरक्षा रक्षक अधिकारी देवेंद्र गाड यांना काढण्याची मागणी : सतावणूक तसेच कर्मचाऱयांना वेळेवर पगार देत नसल्याचा आरोप
प्रतिनिधी /पेडणे
मोपा विमानतळ प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी सायंकाळी स्थानिक नागरिक तसेच ट्रक मालकांनी मोपा विमानतळ बांधकाम कंपनीचे अधिकारी तसेच सुरक्षारक्षक अधिकारी देवेंद्र गाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढला. देवेंद्र गाड हे सुरक्षा रक्षकांची सतावणूक करत असून कर्मचाऱयांना वेळेवर पगार देत नसल्याने त्यांना कामावरुन काढून टाकावे, अशी जोरदार मागणी केली.
मोपा पठारावर कामासाठी असलेले पाच ट्रक बुधवार दि. 23 मार्च रोजी जळून खाक झाल्यानंतर आणि तिथल्या सुरक्षारक्षक तसेच अधिकारी यांच्यातील वाद उफाळून पुढे आले आहेत. शुक्रवारी सायंकाळी विमानतळ प्रवेशद्वारावर ज्यांचे ट्रक आहेत ते लोक तसेच स्थानिकांनी विमानतळ सुरक्षारक्षक विभागाचे प्रमुख तथा माजी निवृत्त पोलीस अधिकारी देवेंद्र गाड यांच्या विरोधात एल्गार केला. स्थानिक सुरक्षारक्षकांची सतावणूक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. देवेंद्र गाड यांची कंपनीने ताबडतोब हाकलपट्टी करावी, अशी जोरदार मागणी प्रवेशद्वारावर नागरिकांनी केली.
मागच्या बुधवारी विमानतळावर जळालेले पाच ट्रक हे शॉर्ट सर्किटमुळे जळले नसून त्यांना आग लावली असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. यावेळी शैलेंद्र वारंग तसेच इतर उपस्थित होते. देवेंद्र गाड हे स्थानिक सुरक्षारक्षकांना तसेच इतर कर्मचारी आहे त्यांचे सतावणूक करत आहेत. ज्यावेळी आवाज उठविला जातो त्यावेळी पगार कसा दिला जातो. कर्मचाऱयांना योग्य वेळेवर पगार देत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून मोपा विमानतळ पठारावरील वातावरण कामगारांमध्ये गढूळ होताना दिसत आहे. यापूर्वीही कामगारांनी पगार वेळेवर देत नसल्याचे कारण पुढे करत एका गाडीवर दगड मारले तसेच एका कार्यालयावार दगडफेक केली होती.
विमानतळ पठारावर प्रवेशद्वारावर पत्रकार व इतरांना प्रवेश दिला जात नसल्याने आत काय घडते याची कुणालाही कल्पना नसते. त्यामुळे आतील जो प्रकार आहे तो बाहेर येत नाही. मात्र या प्रकल्पावर काम करत असलेले सुरक्षारक्षक तसेच अन्य कर्मचारी आपला उदेक हा इतरांकडे बोलून व्यक्त करताना दिसत आहेत. या प्रकरणी सरकारने विशेष लक्ष घालून तसेच स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या प्रकारात विशेष लक्ष घालून यावर आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.