अन्यथा वटणार नाही चेक – बँक खातेधारकाच्या सुरक्षिततेकरता नवी व्यवस्था
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम (पीपीएस) लागू करण्यास प्रारंभ केल्याने आता 50 हजारांहून अधिक रकमेचा धनादेश दिल्यास तपशील सांगावा लागणार आहे. बहुतांश बँकांकडून 1 सप्टेंबरपासून पीपीएसची अंमलबजावणी होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक ट्रान्जेक्शन सिस्टीमसाठी (सीटीएस) ऑगस्ट 2020 मध्ये पॉझिटिव्ह पे सिस्टीमची घोषणा केली होती.
पॉझिटिव्ह पे व्यवस्थेच्या अंतर्गत खातेधारकाकडून प्रदान करण्यात आलेल्या चेकचे (धनादेश) काही तपशील पडताळावे लागतील. संबंधित खातेधारकानेच हा चेक प्रदान केला हे निश्चित करण्यासाठी ही व्यवस्था असणार आहे. या तपशीलामध्ये चेक प्रदान करण्याची तारीख, 6 अंकांचा चेक क्रमांक, लाभार्थीचे नाव इत्यादी सामील आहे. याची माहिती बँक शाखेत जाऊन किंवा इंटनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारेही दिली जाऊ शकते. काही बँकांकडून ग्राहकांना एसएमएस, एटीएम किंवा ईमेलद्वारेही माहिती देण्याची सुविधा देण्यात येत आहे.
मागील वर्षी दिशानिर्देश
आरबीआयने मागील वर्षी दिशानिर्देश दिले होते. बँका सर्व खातेधारकांसाठी त्यांच्या इच्छेनुसार 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशासाठी ही सुविधा लागू करू शकतात. पण बँका 5 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या धनादेशासाठी ही व्यवस्था अनिवार्य करू शकतात. याचमुळे ग्राहकांना आता बँकेने पीपीएस लागू केले की नाही हे पहावे लागणार आहे.
खासगी बँकांकडून अंमलबजावणी
काही खासगी बँकांनी अधिक रकमेच्या धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम अनिवार्य केली आहे. यामुळे धनादेश प्रदान केल्यावर ग्राहकांना बँकेला नेट/मोबाईल बँकिंग किंवा शाखेत तपशील द्यावा लागेल. पण या नियमामुळे विशेषकरून ज्येष्ठ नागरिक आणि सुरक्षेच्या कारणास्तव नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगची सेवा न घेतलेल्या खातेधारकांना समस्या होऊ शकते.
एसबीआयकडून लागू
एसबीआय, कोटक महिंद्रा बँकेनेही पॉझिटिव्ह पे सिस्टीम 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या धनादेशाकरता लागू केली आहे. पण या बँकांनी ग्राहकांसाठी ही व्यवस्था ऐच्छिक ठेवली आहे. बँका काही ग्राहकांना फोन करून याप्रकरणी त्यांची पडताळणी करत आहेत. ही पद्धत ग्राहकांसाठी उपयुक्त आहे, कारण कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचता येणार आहे.
इंटरनेट बँकिंगद्वारे..
इंटरनेट बँकिंगद्वारे धनादेशाची पडताळणी करता येऊ शकते. ग्राहकांना यासाठी नेट बँकिंगवर लॉग इन करावे लागेल. यात सर्व्हिसेस हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर चेक सर्व्हिसेस आणि त्यानंतर पॉझिटिव्ह पे हा पर्याय निवडावा लागणार आहे. ज्या नावाने चेक देण्यात आला, त्याचा तपशील यात टाकावा लागेल. पॉझिटिव्ह पे सिस्टीमद्वारे ग्राहकाला पेमेंटची एक मर्यादा निश्चित करता येऊ शकते. तसेच सर्व धनादेशांसाठीही ही व्यवस्था लागू करता येते.