100 वर्षांच्या इतिहासात तिसरे संकल्प-पत्र – जिनपिंग विरोधात बोलणे ठरणार गुन्हा
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आता अधिक शक्तिशाली होणे जवळपास निश्चित आहे. जिनपिंग यांच्या विरोधात विधान करण्याचे कृत्य चीनमध्ये गुन्हय़ाच्या शेणीत सामील केले जाणार आहे. जिनपिंग यांच्या विरोधात उमटणार प्रत्येक सूर दडपला जाणार आहे. 8 नोव्हेंबरपासून बीजिंगमध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाची 4 दिवसीय परिषद सुरू झाली आहे. सत्तारुढ चिनी कम्युनिस्ट पक्षाचे हे सहावे पूर्ण अधिवेशन आहे.
बैठकीत ‘ऐतिहासिक संकल्प-पत्र’ सादर करण्यात आले असून यात कम्युनिस्ट पक्षाच्या 100 वर्षांमधील कामगिरीवर चर्चा केली जाईल. यादरम्यान जिनपिंग यांच्या तिसऱया कार्यकाळावरही शिक्कामोर्तब होणार आहे. 11 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱया बैठकीत कम्युनिस्ट पक्षाचे 370 वरिष्ठ अधिकारी सामील झाले आहेत. पूर्ण बैठक बंद दाराआड होतेय.
संकल्प-पत्र
जुलै 1921 च्या बैठकीत चिनी कम्युनिस्ट पक्षाचा पाया रचण्यात आला होता. 100 वर्षांच्या इतिहासात चिनी कम्युनिस्ट पक्षाने केवळ दोन संकल्प-पत्र आणले आहेत. 1945 मध्ये पहिला तर 1981 मध्ये दुसरे संकल्प-पत्र आणले गेले होते. या संकल्पांद्वारे माओत्से तुंग आणि डेंग जियाओपिंग यांचे अधिकार वाढविण्यास मदत मिळाली होती. अशा स्थितीत तिसरे संकल्प-पत्रानंतर चीनचे विद्यमान अध्यक्ष क्षी जिनपिंग आता अधिकच शक्तिशाली होणे जवळपास निश्चित आहे. जिनपिंग यांना माओत्से तुंग आणि डेंग यांच्यानंतर चीनचे ‘युग-पुरुष’ घोषित केले जाऊ शकते.
पहिला संकल्प-पत्र
माओच्या संकल्प-पत्राचे नाव ‘रिझॉल्युशन ऑन सर्टेन क्वेश्चन्स इन द हिस्ट्री ऑफ अवर पार्टी’ होते. यात शांघाय नरसंहारापासून लाँग मार्चपर्यंत पक्षाच्या दोन दशकांमधील वाटचालीचा उल्लेख होता. पक्षाच्या कॅडरची निष्ठा प्राप्त करण्यासाठी असे करण्यात आले होते, त्यानंतर माओने सप्टेंबर 1976 पर्यंत स्वतःच्या मृत्यूपर्यंत चीनवर राज्य केले होते.
दुसरा संकल्प-पत्र
माओच्या मृत्यूनंतर डेंग जिआओपिंग हे चीनचे सर्वोच्च नेते झाले. 1981 मध्ये त्यांनी दुसरा संकल्प-पत्र सादर केला होता. यात पक्षाच्या स्थापनेपासून त्यांच्या कार्यकाळापर्यंतच्या इतिहासाचा उल्लेख होता. जियाओपिंग यांनी माओच्या धोरणांवर टीका केली होती. तसेच धोरणांमध्ये मोठे बदल केले होते. जियाओपिंग यांनी आर्थिक सुधारणांवर मोठा भर दिला होता.
तिसऱया संकल्पपत्रात कामगिरीवर भर
तिसऱया संकल्पपत्रात इतिहासावर टीका करण्याऐवजी कामगिरीवर भर असल्याचे जाणकारांचे मानणे आहे. माओ यांच्या संकल्पपत्रावेळी चीन नागरीयुद्ध आणि जपानी आक्रमणाला तोंड देत होता. तर जियाओपिंग यांच्या समोर एक वेगळेच संकट होते. पण जिनपिंग यांच्यासमोर असे कुठलेच संकट दिसून येत नाही.
दोन कार्यकाळांची अट रद्द
जिनपिंग या दशकात चीनचे सर्वात मोठे नेते म्हणून उदयास आले आहेत. 2012 मध्ये त्यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली होती. जिनपिंग यांच्यापूर्वी अध्यक्ष राहिलेले सर्व नेते 5 वर्षांचे दोन कार्यकाळ किंवा 68 वर्षे वय झाल्यावर निवृत्त झाले हेते. 2018 मध्ये चीनने अध्यक्षपदाच्या दोन कार्यकाळांची अट संपुष्टात आणली होती. जिनपिंग यांचा दुसरा कार्यकाळ पुढील वर्षी संपुष्टात येणार आहे. पण ते तिसरा कार्यकाळही स्वीकारणार असल्याचे मानले जातेय.