नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केबल टीव्ही किंवा डायरेक्ट टू होम किंवा अन्य डिजिटल माध्यमांच्याद्वारे टीव्ही चॅनेल्स दाखविणाऱया कंपन्या ग्राहकांकडून नियमापेक्षा जास्त शुल्क आकारणी करत असतील तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. दूरसंचार नियामक मंडळ (ट्राय) ने यासंबंधीची सर्वेक्षणे सुरु केली आहेत. दोन्ही सेवापुरवठादार कंपन्यांना नोटीसा पाठविल्या जाणार आहेत, अशी माहिती आहे.
ट्रायने प्रत्येक केबल आणि डीटीएच कंपनीला चॅनेल्सचे दर ठरवून दिलेले आहेत. तसेच या दराप्रमाणेच शुल्क आकारण्याचे बंधन घातले आहे. मात्र कित्येक केबल आणि डीटीएच कंपन्या निर्धारित शुल्कापेक्षा जास्त दर आकारून ग्राहकांची लुबाडणूक करीत आहेत, अशा तक्रारी ट्रायकडे आल्या आहेत. त्यामुळे ट्रायने चौकशी सुरु केली असून प्रत्येक कंपनीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
टीव्ही चॅनेल्स पाहण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक माध्यमे तयार झाली आहेत. त्यांच्यात केबल टीव्ही, डीटीएच, आयपीटी (इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन) इत्यादींचा समावेश आहे. ही माध्यमे आपापसात संगनमत करुन विशिष्ट भागांमध्ये आपला एकाधिकार तयार करीत आहेत. या एकाधिकाराचा उपयोग करुन ग्राहकांकडून जास्त पैसे घेतले जात आहेत. एखाद्या भागात एकाच माध्यम कंपनीचा एकाधिकार बनल्याने ग्राहकांना त्याच कंपनीकडून सेवा घ्यावी लागते. कारण अन्य कंपन्या त्या भागात सेवा देण्यास तयार नसतात. त्यामुळे स्पर्धात्मकतेचा लाभ ग्राहकांना मिळत नाही. परिणामी अशी एक कंपनी त्या भागात ग्राहकांकडून मनमानी करुन जास्त पैसे उकळते, अशा तक्रारी ट्रायकडे आल्या आहेत.
सेवापुरवठादार कंपन्यांना इशारा
एकाधिकारशाही निर्माण करुन जास्त पैसे घेणाऱया अशा कंपन्यांचा शोध घेतला जाईल आणि त्या दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अशा कंपन्यांना दंड केला जाईल. तसेच आवश्यकता भासल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाऊ शकतो, असा इशारा ट्रायच्या अधिकाऱयांनी दिला आहे.