लुईझिन फालेरोंनी केले स्पष्ट
प्रतिनिधी/ मडगाव
गिरीश चोडणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या गोवा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आपण इच्छूक नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तथा नावेलीचे विद्यमान आमदार लुईझिन फालेरो यांनी स्पष्ट केले आहे. नावेली येथे काल मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली.
ग्राम, जि. पं. निवडणुका पक्षीय पातळीवर नाको
ग्राम पंचायत व जिल्हा पंचायतीच्या निवडणुका पक्षीय पातळीवर होऊ नये. पक्षीय पातळीवर निवडणुका झाल्यास ग्रामीण भागातील नवीन चेहऱयांना संधी मिळणार नाही. अशा निवडणुकीतून आम्हाला नवीन युवा नेते घडविण्याची संधी लाभते, असे फालेरो म्हणाले.
काहीजण 21 चे 24 होण्याची वाट पाहत होते
2017 च्या विधानसभा निवडणुकीत आमचे 17 आमदार निवडून आले होते. तसेच एकूण 21 आमदारांची संख्या आमच्याकडे होती. पण, काही नेते ती संख्या 24 होण्याची वाट पाहत होते. पण तसे न होता तिथे भाजपकडे संख्याबळ नसतानाही त्यांनी सरकार स्थापन केले.
गोव्याचे राजकारण आपण 55 वर्षांचा असताना सोडले होते. राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे कार्य करण्याच्या हेतून तसा निर्णय घ्यावा लागला होता. 2017 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हा ती आपण नाकारली होती, असे आमदार फालेरो यावेळी म्हणाले.
नावेलीतील लोकांना पाण्याची कमतरता नाही
पाच वर्षापुर्वी नावेली मतदारसंघातील लोकांना पाण्याची कमतरता भासत होती. आता सदर समस्या लोकांना नाही. आता दोन 300 व 200 मीली लिटर पाण्याची जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. तसेच ही जलवाहिनी 6 किलोपर्यंतच्या पाण्याच्या दबावावर नियंत्रण ठेवू शकते. त्यामुळे आणखी पाच वर्षेतरी नावेलीतील लोकांना पाण्याची कमतरता भासणार नाही. जर साळावली जलवाहिनी फुटली तरच नावेलीतील लोकांना पाणी मिळणार नाही. त्यामुळे नावेली मतदारसंघातील लोकांना घाबरण्याची गरज नाही. नाताळ सणादिवशीही प्रत्येकाला पाणी मिळेल, असे फालेरो यांनी पुढे सांगितले.
मलनिस्सारण जोडणीचे काम पूर्ण
मलनिस्सारण जोडणीचे काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे पुन्हा विनाकारण रस्ते खोदण्याचे काम सुरु करु नये. पुन्हा पुन्हा रस्ते खोदण्याचे काम केल्यास त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यास सरकारकडे पैशांची कमतरता आहे. सध्या राज्याची आर्थिक स्थिती खुपच बिकट झालेली आहे. तसेच लोकांना योग्य पद्धतीचे रस्ते देण्याचे काम आम्ही केले पाहिजे असे फालेरो म्हणाले.
अध्यक्षपदासाठी आलेक्स रेजिनाल्ड इच्छुक
गिरीश चोडणकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तरी तो अद्याप मंजूर झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पक्ष नेतृत्वाने अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ती आपण स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.