विविध ठिकाणी वाहने अडकण्याचे प्रकार वाढल्याने गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी अंतर्गत अनगोळ येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला डेनेज पाईपलाईन घालण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र ती चर योग्य प्रकारे बुजविली गेली नाही. त्यामुळे अनेक वाहने अडकत होती. मंगळवारी एक वाहन अडकले होते. त्यामुळे वाहन चालकांतून तसेच नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर तातडीने ती चर बुजवून वाहतुकीस रस्ता मोकळा केला आहे.
स्मार्ट सिटीची कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. अनगोळ मुख्य रस्त्याच्या बाजूने पाईप घालण्याचे काम पुन्हा सुरू केले आहे. वारंवार खोदाई करणे व खोदाईनंतर योग्य प्रकारे खड्डे आणि चरी न बुजविल्यामुळे समस्या निर्माण होणे. पावसामुळे दलदल निर्माण होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या. तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
चरी योग्य प्रकारे बुजवाव्यात
अनलॉकनंतर बाजारपेठेत गर्दी होत आहे. खरेदीसाठी नागरिक येत आहेत. वाहनांची वर्दळही वाढली आहे. मात्र ही वाहने या चरींमध्ये अडकून पडत आहेत. तेव्हा या चरी योग्य प्रकारे बुजवाव्यात, अशी मागणी होत आहे. स्मार्ट सिटीची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि अनगोळवासियांना दिलासा द्यावा, अन्यथा त्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला आहे.