व्यापारी संकुलातील गाळय़ांचे भाडे तीस हजार निश्चित केल्याने नागरिकांची पाठ : टिळकवाडीतील गाळय़ांना बोली
प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ नाका येथील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळय़ांचे भाडे तीस हजार रुपये निश्चित करण्यात आल्याने दुसऱयांदा आयोजित करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेवेळी कोणीच बोली लावली नाही. नवबाग खासबाग येथील गाळय़ांनाही प्रतिसाद लाभला नाही. मात्र, टिळकवाडी येथील सात गाळय़ांना भाडेकरू मिळाले आहेत.
महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी रिकामी झालेले गाळे आणि भाडे कराराची मुदत संपलेले गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. अनगोळ नाका येथील दोन गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी बुधवारी दुसऱयांदा लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. सदर गाळे मोठे असल्याने पाच लाख रुपये अनामत रक्कम आणि प्रतिमहिना तीस हजार रुपये भाडे महापालिकेने निश्चित केले होते. गाळे मुख्य रस्त्यावर असल्याने ते भाडेतत्त्वावर घेण्यासाठी अनेक व्यावसायिक इच्छुक होते. पण गाळय़ांचे भाडे जास्त असल्याने नागरिकांनी लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरविली होती. टिळकवाडी येथील सात गाळय़ांचा लिलाव आयोजित केला होता. लिलावप्रसंगी सातही गाळय़ांना बोली लावण्यात आली. महापालिकेने प्रतिमहिना अकराशे रुपये भाडे निश्चित केले होते. पण या गाळय़ांना जास्त बोली लावण्यात आली नाही. या गाळय़ांना तेराशे रुपये सर्वाधिक बोली लावण्यात आली. सातही गाळय़ांना भाडेकरू मिळाले आहेत.
मागील वेळी नवबागवेस गोवावेस येथील चार गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता. चारपैकी केवळ दोन गाळय़ांना बोली लावण्यात आली. यामुळे चारपैकी दोन गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. त्यामुळे दोन गाळे व हॉल भाडेतत्त्वावर देण्यासाठी बुधवारी लिलाव आयोजित करण्यात आला होता. यावेळी या गाळय़ांच्या भाडय़ाच्या रकमेत दोन हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती. लिलाव प्रक्रियेवेळी महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, कायदा अधिकारी यु. डी. महांतशेट्टी, मार्केटचे महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर, शिवा जाधव, लेखाधिकारी बजंत्री, सुशांत कांबळे, अशोक गुदली यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.