महसूल विभागाचे कामकाज बंद असल्याने निर्माण झाला होता संभ्रम
प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ येथील दुकाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी गुरुवार दि. 22 रोजी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. मात्र, मनपा महसूल विभागातील कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाल्याने लिलाव प्रक्रिया होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण ही लिलाव प्रक्रिया कार्यालयाबाहेर असल्याने कोणतीच अडचण नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे अनगोळ आणि खासबाग येथील गाळय़ांसाठी लिलाव होणार आहे.
महसूल विभागातील कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाल्याने महसूल विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारी आयोजित करण्यात आलेली लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात येणार का? असा मुद्दा उपस्थित झाला होता. पण सदर लिलाव प्रक्रिया अनगोळ येथील व्यापारी संकुलाच्या आवारात आयोजित केली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लिलाव प्रक्रिया करण्यास कोणतीच अडचण नसल्याचे स्पष्टीकरण महापालिका आयुक्तांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱयांना दिले आहे. त्या ठिकाणी लिलाव प्रक्रिया करावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे गुरुवारी ही लिलाव प्रक्रिया होणार आहे. महापालिकेचे विविध गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. खासबाग येथील व्यापारी संकुलातील चार गाळे आणि त्यावरील हॉल भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया होणार आहे. दुकानांसाठी एक लाख रुपये अनामत रक्कम आणि तीन हजार रुपये प्रति महिना भाडे ठरविण्यात आले आहे. हॉलसाठी 13 हजार रुपये भाडे, दोन लाख साठ हजार रुपये अनामत रक्कम महापालिकेने निश्चित केली आहे. अनगोळ नाका येथील 300 चौ. फुटांची दोन दुकाने भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. याकरिता पाच लाख रुपये अनामत रक्कम आणि 30 हजार रुपये भाडे महापालिकेने निश्चित केले आहे. सदर लिलाव प्रक्रिया अनगोळ नाका येथील गाळय़ांच्या आवारात गुरुवार दि. 22 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.