पोटदुखीला कंटाळून संपविले जीवन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोनवाळ-डॉ. आंबेडकरनगर, अनगोळ येथील एका विवाहितेने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली आहे. पोटदुखीला कंटाळून तिने आपले जीवन संपविल्याचे कुटुंबीयानी फिर्यादीत म्हटले आहे.
महादेवी निंगाप्पा मैलागोळ (वय 20) असे त्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. केवळ दीड वर्षापूर्वी निंगाप्पाबरोबर तिचे लग्न झाले होते. तिच्या पश्चात पती, आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. महादेवीचा भाऊ इराप्पा नाईक याने फिर्याद दिली आहे.